राहत्या फ्लॅटमध्ये विषारी द्रव प्राशन : स्वत:च दुचाकीने ग्रामीण रुग्णालयात दाखल
कौटुंबिक कारणातून आत्महत्या
केल्याचा प्राथमिक अंदाज
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजितकुमार बाळकृष्ण पाटील (42, सध्या रा. कुडाळ-कुडाळेश्वरवाडी, मूळ रा. वाळवा-सांगली) यांनी रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास विषारी द्रव प्राशन केले. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पडवे येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. मात्र, काही वेळातच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेने कुडाळ पोलीस ठाण्यासह सिंधुदुर्ग पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ओरोस पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
अजितकुमार यांचे सांगली जिल्हय़ात वाळवा तालुक्मयातील घोटखिंडी हे मूळ गाव आहे. आर्मीमध्ये 15 वर्षे सेवा बजावून सहा वर्षांपूर्वी ते पोलीस दलात भरती झाले होते. प्रथम त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयात सेवा बजावल्यानंतर गेली तीन वर्षे ते कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची पत्नी व दोन मुलगे तीन महिन्यांपूर्वी गावी गेले आहेत. येथील शुभम कॉम्प्लेक्समधील आपल्या फ्लॅटमध्ये ते सध्या एकटे राहायचे.
पालकमंत्र्यांच्या दौऱयात होते बंदोबस्ताला
रविवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱयानिमित्त येथे नेमलेल्या बंदोबस्तामध्ये ते डय़ुटीवर होते. रात्री 8.30 वाजता डय़ुटी संपवून ते पोलीस ठाण्यात गेले. तेथे हजेरीला उपस्थित होते. नंतर आपल्या फ्लॅटवर गेले आणि रात्रीच 9.30 च्या सुमारास त्यांनी झाडावर फवारणीचे विषारी द्रव प्राशन केले. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्याच स्थितीत ते स्वतः आपल्या मोटारसायकलने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.
डॉक्टरांना आपण विषारी द्रव प्राशन केल्याचे सांगितले
त्यांच्या मित्राने कुडाळचे वाहतूक पोलीस संभाजी पाटील यांना याची कल्पना दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद वालावलकर यांना अजितकुमार यांनी आपण विषारी द्रव प्राशन केल्याचे सांगितले. डॉ. वालावलकर व सहकाऱयांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, संभाजी पाटील, रामदास जाधव, एन. यू. हिप्परकर, मंगेश जाधव, कदम व अन्य पोलीस सहकाऱयांनी लागलीच येथील रुग्णालयात धाव घेतली. अजितकुमार यांची प्रकृती अधिकच खालावू लागल्याने त्यांना पोलीस सहकाऱयांनी तात्काळ पडवे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे उपचार सुरू असताना रात्री 11.30 च्या सुमारास त्यांचे निधन झाले.
वाहतूक पोलीस म्हणूनही केले काम
हवालदार मंगेश शिंगाडे व रामदास जाधव यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी पंचनामा केला. अजितकुमार येथील पोलीस ठाण्यात कार्यरत झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी शहरात वाहतूक पोलीस म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.