दिवसभर संपूर्ण व्यवहार बंद :10 नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन
वार्ताहर /कुदनूर
कुदनूर येथील अतिक्रमण गाळे तत्काळ हटविण्याच्या ग्रामसभेच्या मागणीनुसार मंगळवारी होणारी कारवाई लांबणीवर पडली आहे. तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिक्रमणाबाबत चर्चा करून कारवाई करण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कुदनूर येथे दि. 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत गट नं. 1069 मधील अतिक्रमणीत गाळे तात्काळ हटविण्याची कारवाई करावी, असा ठराव पारित करण्यात आला होता. या ठरावाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाकडून अतिक्रमण केलेल्या गाळेधारकांना नोटीस देऊन दि. 26 ऑक्टोबर पूर्वी अतिक्रमण काढून घेण्याचे कळविण्यात आले होते. अन्यथा अतिक्रमण काढण्याची कारवाई ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायतीकडून तत्काळ करण्यात येणारी कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी गाळेधारकांनी केली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशासनाकडून अतिक्रमण तुर्तास स्थगित करून 10 नोव्हेंबरपूर्वी गाळेधारकांनी अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा अतिक्रमणाची कारवाई करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. याशिवाय गाळेधारकांचे योग्य ठिकाणी व्यवसायानुसार ग्रामपंचातीमार्फत पुनर्वसन करण्यात येणार असून, दोन टप्प्यात अतिक्रमणाची कारवाई होणार आहे. यावेळी तहसीलदार विनोद रणावरे, उपनिरीक्षक कारंडे, टीपीओ कांबळे, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत सोनार, उपसरपंच नामदेव कोकितकर, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील, तंटामुक्त अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते.