कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाड एमआयडीसीतील एका खत कंपनीच्या बंद गोडाउनमध्ये तरुण प्रेमी युगुलाने दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून या युगलाने आत्महत्या का केली याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्त्या केलेली युवती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दोघांनी गोडाऊनमधील लोखंडी ॲगलला एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामध्ये पांडुरंग दादासो दुधाळ (वय २१, रा.चिंतामणनगर, आरटीओ ऑफीसजवळ, माधवनगर) तर एक अल्पवयीन मुलगी अशी आत्महत्या केलेल्या मयतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मयत पांडुरंग दुधाळ हा कुपवाड एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होता. तर मयत तरुणी याच परिसरात राहत होती. काही दिवसापासून या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. एमआयडीसीलगत एका खत कंपनीचे गोडाऊन रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने बंद होते. सोमवारी सकाळी त्या कंपनीतील कामगाराने गोडाऊनचा दरवाजा उघडला असता एक मलगा व मुलगी या दोघांनी एकाच नाॅयलाॅन दोरीने लोखंडी ॲगलला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस व आयुष हेल्पलाइन टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर हेल्पलाइन टीमने दोन्ही मृतदेह खाली उतरले.उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उत्तरीय तपासणी अहवाल आल्यानंतर आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.