कुपवाड /प्रतिनिधी :
कुपवाड एमआयडीसीलगतच्या तानंग फाट्याजवळील एका मोकळया जागेत तीन पानी जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर कुपवाड व मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील जुगारातील रोख रकमेसह तब्बल ६ लाख ७२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्यामध्ये महमदअली शरीफुलहसन पटेल (४०, रा.सांगलीवेस, मिरज), चंद्रकांत आदिनाथ उपाध्ये (३५, रा. वखारभाग, सांगली), महेंद्र चवगोंडा कांबळे (४५, रा. कळंबी), रियाज शमशुद्दीन बेग (५०, रा. गुरुवार पेठ, मिरज), अरुण विष्णु कांबळे (४५, रा. जैननगर, शिरोळ), अकबर बाबासाहेब लवगे (४४, रा. ईदगाहनगर, मिरज), जिनगोंडा बापू पाटील (६०, रा.कळंबी), दगड़ू विठ्ठल भोरे (६०, रा. कांचनपुर), आनंद विलास कवडे (४०, रा.मिरज), सज्जाद मन्सूर मोमीन (५०, रा.मोमीनगल्ली, मिरज) व मारुती नरसिंग बरगाले (७०, रा. नदीवेस मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुपवाड एमआयडीसीलगत असणाऱ्या तानंग फ़ाटया जवळील रेखा विशालसिंग रजपूत यांच्या मोकळया जागेशेजारी भिंतीच्या आडोशाला तीनपानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे व मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आदित्य मिरखेलकर यांना मिळाली. त्यानुसार कुपवाड व मिरज ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी छापा टाकला. या ठिकाणी तीन पानी पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळताना ११ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी त्यांचे जवळील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम ७४ हजार ६६० रुपये, ११ मोबाईल, ८ मोटरसायकली व एक चारचाकी गाडी असा एकूण ६ लाख ७२ हजार ८६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.