प्रतिनिधी/ बेळगाव
महसूल वाढविण्यासाठी बुडाने 120 भूखंडांची विक्री करण्यासाठी लिलाव केला होता. मात्र, ई-लिलावाद्वारे विक्री करण्यासाठी बोली लागलेल्या लिलाव प्रक्रियेला न्यायालयाचा ब्रेक लागला आहे. त्यामुळे नव्याने 43 भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असून याकरिता ई-लिलाव आयोजित केला आहे. दि. 1 व 2 जुलै रोजी या कॉर्नर भूखंडांसाठी बोली लागणार आहे.
नवीन वसाहत योजना राबवून त्याद्वारे मिळणाऱया उत्पन्नातून शहरात विकासकामे राबविली जातात. मात्र, बऱयाच वर्षांपासून नवीन वसाहत योजना राबविण्यास बुडा अपयशी ठरले आहे. त्यामुळे महसूल घटला असून, विकासकामे राबविण्यासाठी आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे यापूर्वी राबविण्यात आलेल्या भूखंडांची विक्री करून त्यामधून विकासकामे राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याकरिता 9 महिन्यांपूर्वी रामतीर्थनगर व विविध परिसरातील 141 भूखंडांच्या विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र, यापैकी 120 भूखंडांकरिता बोली लागली होती. सदर भूखंडांना सर्वाधिक बोली लावणाऱयांची यादी तयार करून बुडाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच या योजनेतील जमीन मालकांनी न्यायालयात धाव घेऊन लिलाव प्रक्रियेला स्थगिती घेतली होती. त्यामुळे 120 भूखंडांच्या विक्रीला ब्रेक लागला होता. यापूर्वी राबविण्यात आलेल्या ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती असल्याने बुडाने कुमारस्वामी लेआऊटमधील 43 कॉर्नर भूखंड विक्री करण्याचा निर्णय घेऊन लिलाव प्रक्रिया राबविली आहे. या लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी दि. 30 जून पूर्वी अनामत रक्कम व ई-लिलाव प्रक्रियेत नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर दि. 1 व 2 जुलै रोजी भूखंडांसाठी बोली लागणार आहे. ऑनलाईन नोंदणी करून अनामत रक्कम भरल्यानंतरच ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. विविध व्यावसायिक कारणासह रहिवासी वापरासाठी कॉर्नरवरील भूखंडांची मागणी अधिक आहे. त्यामुळे कुमारस्वामी लेआऊटमधील भूखंडांची विक्री ई-लिलाव प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.