ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी लष्करी अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना विनाअट परवानगी दिली आहे.
गुरुवारीच इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयातील दोन राजनैतिक अधिकाऱ्यांनी कुलभूषण यांची भेट घेतली. त्यांना या भेटीत मुक्त सवांद साधता आला नाही. पाकिस्तानने तशी सोय केली नव्हती. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडे तिसऱ्यांदा कुलभूषण यांच्या भेटीची परवानगी मागितली.
कोणत्याही अडथळ्यांशिवाय आणि विनाअट कुलभूषण यांच्याशी चर्चा करता यावी, अशी विनंती भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी पाकिस्तानकडे केली. तसेच भेटीवेळी सुरक्षा कर्मचारीही न ठेवण्याची मागणी भारताने केली होती. पाकिस्तानने ही अट मान्य करून, कुलभूषण यांना भेटण्यासाठी भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे.
हेरगिरी आणि दहशतवादाच्याआरोपाखाली कुलभूषण हे पाकिस्तानमध्ये अटकेत असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल 2017 मध्ये ही शिक्षा सुनावली आहे.