चमत्काराची अपेक्षा, लेहच्या कुलुम गावातील स्थिती- उन्हाळय़ात पाण्याच्या समस्येवरील उपाय
सिंधू नदीच्या खोऱयातील लेहपासून 55 किलोमीटर अंतरावर वसलेले कुलुम गाव सध्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तोंड देत आहे. या समस्येमुळे लोक आता गाव सोडून जाऊ लागले आहेत. हे गाव शेती तसेच दैनंदिन गरजेसाठी हिमवृष्टी आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मागील काही वर्षांमध्ये पुरेशी हिमवृष्टी न झाल्याने पाण्याचे संकट वाढले आहे. याचमुळे गावातील 11 पैकी 7 कुटुंबांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. पण उर्वरित लोकांना आइस स्तुपच्या रुपात उभारलेल्या कृत्रिम ग्लेशियरने अपेक्षेचा नवा किरण दाखविला आहे.

या ग्लेशियरमुळे उन्हाळय़ात पाण्याची गरज भागेल अशी गावात राहत असलेल्या कुटुंबांना आशा आहे. गावकऱयांनी हिमालयन इन्स्टीटय़ूट ऑफ अल्टरनेटिव्ह्स लडाखच्या मदतीने गावावरील भागात तीन स्तूप तयार केले आहेत.
हा प्रकल्प यशस्वी ठरून पाण्याची टंचाई दूर करेल आणि आमचे शेजारी लवकरच परततील अशी अपेक्षा असल्याचे उद्गार ग्रामस्थ उरगेन छोरल म्हणाली. मागली वर्षी प्रयोगादाखल छोटा ग्लेशियर तयार करण्यात आला होता आणि त्यामुळे गावकऱयांना मोठी मदत झाली होती.
लोक परततील अशी आशा
पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कृत्रिम ग्लेशियर अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण पाण्याच्या कमतरतेमुळे गावं ओसाड होत आहेत. या गावांची यशोगाथा पर्यटकांनाही आकर्षित करणार असून यातून गावाच्या अर्थकारणाला बळ मिळणार असल्याचे उद्गार या प्रकल्पाचे मार्गदर्शक सोनम वांगचुक यांनी काढले आहेत.