प्रतिनिधी / बेंगळूर
केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बेंगळूरसह कर्नाटकात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. बंद केवळ आंदोलनापुरताच मर्यादित राहिला. संमिश्र होराट संघटनेने बेंगळूरच्या टाऊन हॉलबाहेर आंदोलन हाती घेतले. याप्रसंगी पोलिसांनी शेतकरी नेते कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी टाऊन हॉलजवळ संमिश्र होराट संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन हाती घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून रोखले. आंदोलनप्रसंगी बोलताना कोडिहळ्ळी चंद्रशेखर म्हणाले, आंदोलने दडपण्याचे काम सरकार निरंतरपणे करत आहे. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट होत आहेत. दरवाढीवर तोडगा काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. मात्र, ही बाब लपविण्यासाठी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका त्यांनी केली. सरकारवरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीविरुद्ध काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.