ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीमध्ये कृषी विधेयकाविरोधात आज सकाळी 15 ते 20 लोक इंडिया गेटजवळ आले आणि त्यांनी ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आणि ट्रॅक्टर बाजूला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. अग्निशमन दलाला सकाळी 7.45 वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझविली.
नवी दिल्लीचे डीसीपी ईश सिंघल यांनी सांगितले की, 10 ते 15 लोकांचा जमाव या ठिकाणी आला आणि त्यांनी ट्रॅक्टरला आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत काही जणांना ताब्यात घेतले आणि आगही आटोक्यात आणली आहे. तसेच या लोकांवर कारवाई केली जाणार असून या लोकांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचा तपास सुरू आहे.