प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरात काही ठिकाणी साचलेल्या कचऱयामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गर्दी ठिकाणी असलेला कचरा हटविण्याची मागणी करण्यात आल्याने कॅन्टोन्मेंटच्यावतीने मंगळवारी कॅटल रोड शेजारील कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली. अशाच प्रकारे प्रत्येक रस्त्याशेजारील कचरा हटवून स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील अनेक ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. अपुऱया निधीमुळे आणि अपुऱया कामगारांमुळे संपूर्ण कॅन्टोन्मेंट हद्दीमधील रस्त्यांशेजारील कचऱयाची उचल केली जात नाही. परिणामी काही ठिकाणी कचऱयाला आग लावण्याचे प्रकार घडत आहेत.
रामघाट रोड व युनियन जिमखाना परिसरात ग्रामीण भागातील बसथांबे असून याठिकाणी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरात कचरा टाकण्यात येतो. तसेच मूलमूत्र करण्यात येत असल्याने बस प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील रहिवाशांनादेखील नाहक त्रास होत असल्याने याबाबत
कॅन्टोन्मेंटकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने कॅटल रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.