कॅन्टोन्मेंट कार्यालयातील बैठकीत सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य वावा यांच्याकडे मागणी : केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा आग्रह
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांप्रमाणेच कॅन्टोन्मेंटमधील कामगारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच कामगारांसाठी कायमस्वरुपी घरे मंजूर करावीत, याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी कॅन्टोन्मेंट कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आली. वाल्मिकी मंदिराची लीज वाढवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे पी. पी. वावा यांना घालण्यात आले.
सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी. पी. वावा यांची बैठक कॅन्टोन्मेंट कार्यालयात आयोजित केली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता कामगारांना पुरविण्यात येणाऱया सुविधांची माहिती पी. पी. वावा यांनी घेतली. स्वच्छता कामगारांना विविध सुविधा पुरविल्या जात असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या अधिकाऱयांनी दिली. पण महापालिकेप्रमाणे सुविधा दिल्या जात नाहीत, अशी तक्रार अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली. महापालिकेत कामगारांना विविध सुविधा दिल्या जातात. त्याप्रमाणेच कॅन्टोन्मेंटच्या कामगारांनाही सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांना कायमस्वरुपी घरे देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. कामगारांना केंद्र शासनाच्या स्केलनुसार वेतन देण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली.
कॅन्टोन्मेंटकडे निधी नसल्याने महापालिकेप्रमाणे कामगारांना सुविधा देता येत नसल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा यांनी सांगितले. त्यामुळे कर्मचारी आयोगानेच केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून स्वच्छता कामगारांसाठी निधीची तरतूद करावी, अशी सूचना कर्मचारी संघटनेने केली. स्वच्छता कामगारांसाठी नव्याने क्वॉर्टर्स बांधण्यात येत आहेत. ही बाब चांगली असून कायमस्वरुपी घरे मंजूर करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा, सफाई मजदूर संघटनेचे दीपक वाघेला, काशिराम चक्हाण, विजय नरगट्टी आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित होते.