प्रतिनिधी/ मडगाव
नव्याने स्थापन झालेल्या गेंयचो आवाज पार्टीचे प्रदेश निमंत्रक कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांनी त्यांच्या दाबोळी मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचा मानस जाहीर केला आहे. कॅप्टन विरियाटो हे व्यवसायाने अभियंता व संरक्षक दलाशी संबंधित राहिलेले असून ते नुकतेच भारतीय नौदलातून निवृत्त झाले आहेत.
मातृभूमीबद्दलच्या अटळ बांधिलकीमुळेच आपण गोवा वाचविण्याच्या लढाईचे नेतृत्व करण्यास उद्युक्त झालो आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गोव्याबद्दलच्या प्रेमामुळे परदेशातील फायदेशीर नोकरीच्या मोहात ते पडलेले नाहीत. त्याऐवजी कॅप्टन विरियाटो यांनी गोव्यात राहणे आणि राज्याच्या उत्कर्षासाठी काम करणे निवडले आहे.
या घोषणेविषयी विस्तृत माहिती देताना कॅप्टन विरियाटो म्हणाले की, मी कधीही राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवल्या नव्हत्या. माझे ध्येय माझ्या मातृभूमीला त्रास देत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे आहे. तथापि, गोव्याचा घाऊक विनाश चालल्याने आणि विशेषतः दाबोळीत सध्या राजकीय नेत्यांच्या लोभामुळे गंभीर विनाश चालल्याने गोव्याला वाचविण्यासाठी राजकीय क्षेत्रात येण्यास मला उद्युक्त केले आहे. लोकांसमवेतच्या भागीदारीने सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील. मला आशा आहे की, एकत्रितपणे आपण गोव्यातील स्वच्छ राजकारणाच्या युगाची सुरुवात करू शकू, असे त्यांनी म्हटले आहे.