आयटी पार्क-इंडस्ट्रीयल हबची घोषणा शक्य : कापडावर जीएसटी वाढल्यास फटका बसणार
प्रतिनिधी /बेळगाव
केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडे आता बेळगावकरांचे लक्ष लागून आहे. बेळगाव आयटी पार्क-इंडस्ट्रीयल हबची घोषणा होऊन निधी मंजूर करण्याची शक्मयता आहे. औद्योगिक क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य व कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बेळगावमधील व्यापारी, विद्यार्थी, शेतकऱयांच्या या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा असून त्या पूर्ण होतात का? हे मंगळवारी पहावे लागणार आहे.
बेंगळूर येथील आयटी पार्कचे केवळ देशातीलच नाही तर परदेशातील नागरिकांनाही आकर्षण आहे. याच धर्तीवर बेळगावमध्ये आयटी पार्क सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे बेळगावसह आसपासच्या भागातील युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बेळगावमध्ये उद्यमबाग, ऑटोनगर, मच्छे, नावगे, होनगा औद्योगिक क्षेत्र आहे. या ठिकाणी ऑटोमोबाईल, यंत्रे, औषधे यासह इतर साहित्य तयार केले जाते. या साहित्याची इतर देशांमध्येही निर्यात होते. त्यामुळे बेळगावमध्ये इंडस्ट्रीयल पार्क सुरू करण्याची शक्मयता आहे.
आणखी एका मेडिकल कॉलेजची गरज
शैक्षणिक क्षेत्रात बेळगावने चांगली प्रगती केली असली तरी अद्याप नवीन अभ्यासक्रम शिकविणारी कॉलेज सुरू होणे आवश्यक आहे. बेळगाव जिल्हय़ात सध्या 17 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, तर एक खासगी व एक सरकारी मेडिकल कॉलेज आहे. पुढील काळातील वैद्यकीय गरजा पाहता अजून एका मेडिकल कॉलेजची या ठिकाणी गरज आहे. यामुळे वैद्यकीय सेवेतील तफावत कमी करण्यास मदत होणार आहे.
टेक्सटाईल व्यवसायाचे लागले लक्ष
बेळगाव हे यंत्रमाग व हातमाग व्यवसायासाठी ओळखले जाते. जुने बेळगाव, खासबाग, वडगाव, सुळेभावीसह रामदुर्ग तालुक्मयात यंत्रमागधारकांची संख्या सर्वाधिक आहे. कापड व्यवसायाला सध्या 5 टक्के जीएसटी आहे. परंतु तो 12 टक्के करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे. जीएसटीत वाढ केल्यास यंत्रमागधारकांपासून कापड व्यावसायिकांपर्यंत सर्वांना फटका बसणार आहे. त्यामुळे मंगळवारी जीएसटीत वाढ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोरोनाकाळात यंत्रमागधारकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्यासाठी कोणती योजना जाहीर होते, याकडे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारने राबविलेले, घोषणा केलेले उपक्रम
- स्मार्ट सिटी
- उडान-3
- बेळगाव-धारवाड (कित्तूर) व कुडची-बागलकोट रेल्वेमार्ग
- बेळगाव शहराभोवती रिंगरोड
- बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग
- रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण