ऑनलाईन टीम
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शहा यांनी ट्वीट करून कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. अमित शहा एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर मी चाचणी केली आणि अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे. पंतु, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या पैकी कोणी माझ्या संपर्कात आला असेल तर कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवा आणि कोरोनाची चाचणी करून घ्या, असं आवाहन शहा यांनी ट्वीटमधून केले आहे.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्यात दररोज ५० हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. यामध्ये कलाकार आणि राजकारणी लोकांनाही कोरोनाने विळखा दिला आहे. उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि भाजप नेत्या कमल राणी वरुण यांचे आज कोरोनाने निधन झाले.