बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. याला परिवहन मंडळदेखील अपवाद नाही. लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी या खात्यात सेवा बजावणाऱयांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. बेळगाव विभागातील परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांचे जून महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचारी अडचणीत आले आहेत.
लॉकडाऊनमुळे परिवहन मंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस बराच काळ थांबून होत्या. त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प होऊन परिवहनला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यातच आता प्रवाशांची संख्या रोडावल्याने परिवहनला दररोज 50 लाखहून अधिक तोटा सहन करावा लागत आहे. दररोजच्या महसुलावर परिणाम होऊन उत्पन्नही थांबले आहे. त्यामुळे कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठी निधीची कमतरता जाणवत आहे. कर्मचाऱयाचे वेतन वेळेत देणे शक्मय नसल्याचे दिसत आहे. सध्या परिवहन मंडळाच्या बसेस प्रवाशांच्या संख्येनुसार धावत आहेत. मात्र सर्व बसचालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
सर्व निगम-महामंडळांमध्ये 1 लाख 20 हजार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱयांमध्ये वेतनाची चिंता लागली आहे. यापूर्वी कर्मचाऱयांचे एप्रिल महिन्याचे वेतन उशिराने झाले होते. दरम्यान, एप्रिल महिन्याच्या वेतनाला राज्य सरकारने संमती दिली होती. त्यावेळी परिवहनच्या कर्मचाऱयांना अर्थखात्याकडून वेतन मंजूर झाले होते.