ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यासोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढली आहे. दिल्लीत बुधवारी दिवसभरात 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने आता नियम आता अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मास्क घातल्यास दिल्लीकरांना आता दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

आतापर्यंत दिल्लीत मास्क न घालणाऱ्यांना 500 रुपये दंड घेतला जात होता. मात्र नागरिक तरी देखील मास्क वापराबाबत गंभीर झालेले नसल्याचे दिसून आले आणि त्याचा परिणाम रुग्ण संख्या वाढलेला दिसून आला. त्यामुळे आता केजरीवाल सरकारने दंडाची रक्कम दोन हजार रुपये केली आहे.
दरम्यान, दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने लवकरच अतिरिक्त 300 आयसीयू खाटा उपलब्ध करण्याचा आणि दैनंदिन आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय रविवारी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे प्राणवायूसह आरोग्यविषयक अन्य उपकरणेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.