क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
केरळ ब्लास्टर्सचा 2-0 गोलांनी पराभव करून नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने सातव्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळविला. वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेडसाठी सुहैर वाडाक्केपिडिका आणि लालेंगमाविया यांनी गोल केले.
आयएसएलची प्ले-ऑफ फेरी गाठण्यासाठी नॉर्थईस्ट युनायटेडला केरळ ब्लास्टर्सविरूद्धच्या लढतीत केवळ बरोबरीची आवश्यकता होती, मात्र खलीद जमिल यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱया नॉर्थईस्ट युनायटेडने आरामात विजय मिळविला आणि पुढील फेरी गाठली.
एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसीनंतर प्ले-ऑफमध्ये स्थान मिळविणारा नॉर्थईस्ट युनायटेड संघ आता तिसरा संघ बनला आहे. आता चौथ्या स्थानासाठी एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यात जबरदस्त चुरस निर्माण झाली आहेत. या दोन्ही संघांत 28 रोजी लढत होणार आहे. एफसी गोवाचे 19 सामन्यांतून 30 तर हैदराबादचे 19 सामन्यांतून 28 गुण आहेत. सामना बरोबरीत राहिला तर एफसी गोवा प्ले-ऑफमध्ये जाईल. हैदराबाद एफसीने विजय मिळविला तर ते प्ले-ऑफमध्ये जातील.
शुक्रवारी विजयान्Rतर नॉर्थईस्ट युनायटेडने तिसरे स्थान मिळविले. त्यांचे 20 सामन्यांतून आठ विजय, नऊ बरोबरी आणि तीन पराभवाने 33 गुण झाले. केरळ ब्लास्टर्सचा हा 20 व्या सामन्यांतील नववा पराभव होता. तीन विजय आणि आठ बरोबरीने त्यांचे 17 गुण झाले व दहावे स्थान कायम राहिले.
या सामन्यात पहिल्या सत्रातच दोन गोल करून नॉर्थईस्ट युनायटेडने आपला प्ले-ऑफमधील प्रवेश निश्चित केला होता. पूर्ण सामन्यात त्यांचेच खेळावर वर्चस्व आढळून आले. सामन्याच्या सातव्याच मिनिटाला केरळ ब्लास्टर्सने पहिली धोकादायक चाल रचली. यावेळी कप्तान जेसल कार्नेरोच्या क्रॉसवर बाकारी कोनचा हेडर गोलमध्ये जाताना किंचित हुकला. सामन्याच्या 34 व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडने आघाडीचा गोल केला. सुहैर वाडाक्केपिडिकाने मध्यभागातून मिळालेल्या पासवर प्रथम बचावपटू संदीप सिंग व नंतर गोलरक्षक आल्बिनो गोम्सला भेदले आणि गोल नोंदविला. मध्यंतराच्या ठोक्याला लालेंगमावियाने अफलातून गोल केला आणि नॉर्थईस्टची आघाडी दोन गोलांनी वाढविली. डायलन फॉक्सच्या पासवर लालेंगमावियाने 30 यार्डवरून मारलेला शक्तिशाली फटका आल्बिनोला भेदत गोलमध्ये गेला. दुसऱया सत्रात 51 व्या मिनिटाला ब्लास्टर्सची संदीप सिंग आणि जॉर्डन मरे यांच्या चालीवर के. पी. राहुलची गोल करण्याची संधी हुकली. त्यानंतर नॉर्थईस्टच्या लुईस माशादो आणि डेशॉर्न ब्राऊन यांचे गोल करण्याचे यत्न हुकले.