प्रतिनिधी/ खेड
शिमगोत्सवासाठी गावी येण्यासाठी चाकरमान्यांची मंगळवारपासून लगबग सुरू झाली आहे. एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला असून रेल्वे गाडय़ांचाच आधार घ्यावा लागत आहे. कोकण मार्गावर धावणाऱया मोजक्याच गाडय़ांमुळे गर्दी उसळत असून आतमध्ये शिरण्यासाठी प्रवाशांना चढाओढ करावी लागत आहे. रेल्वे गाडय़ांतून लोंबकळत प्रवास करून गाव गाठण्याची वेळ चाकरमान्यांवर ओढवली आहे.
मागील 2 वर्षापासून कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग 2 वर्षे चाकरमान्यांनी शिमगोत्सवाकडे पाठच फिरवली होती. कोरोनाच्या कडक नियमांमुळे असंख्य चाकरमान्यांची गावच्या देवीच्या दर्शनाची संधी हुकली होती. यंदा मात्र कोरोना आटोक्यात आला आहे. याचमुळे शिमगोत्सवासाठी गावी येण्याची ओढ चाकरमान्यांना लागली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून काही चाकरमान्यांनी आर्थिक भुर्दंड सहन करत गाव गाठण्यास सुरूवात केली आहे.
यंदा कोरोना नियंत्रणात आल्याने शिमगोत्सवासाठी गावी जाण्याचे नियोजन चाकरमान्यांनी केलेले असतानाच एसटी कर्मचाऱयांच्या संपाचा फटका त्यांना बसला आहे. एसटी फेऱयांअभावी चाकरमान्यांना गाव गाठताना यातायातीला समोर जावे लागत आहे. त्यातच मोजक्याच रेल्वे गाडय़ांमुळे चाकरमान्यांच्या त्रासात आणखीच भर पडली आहे. अपुऱया रेल्वे गाडय़ांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱया नियमित रेल्वे गाडय़ांसह होळी स्पेशल गाडय़ा ‘हाऊसफुल्ल’च धावत आहेत.
कोकण मार्गावर धावणाऱया सर्वच प्रवाशांची गर्दी उसळत असून प्रवाशांचा लोंबकळत प्रवास सुरू झाला आहे. आतमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाकरमान्यांना चढाओढ करावी लागत आहे. मंगळवारी रात्री मुंबईतून सुटलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसला प्रवाशांची गर्दी उसळली होती. प्रवाशांना अक्षरशः तासन्तास उभे राहूनच गाव गाठावे लागले. एसटी कर्मचाऱयांनाच्या संपामुळे खासगी वाहनांचाही भाव चांगलाच वधारला आहे. मात्र तरीही आर्थिक भुर्दंड सोसत चाकरमानी गाव गाठणे पसंत करत आहेत.
आज एलटीटी-ठोकूर होळी स्पेशल धावणार
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर आज लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकूर होळी स्पेशल चालवण्यात येणार आहे. त्यानुसार 01017 क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-ठोकूर स्पेशल एलटीटीहून दुपारी 1.30 वाजता सुटेल. दुसऱया दिवशी सकाळी 7.10 वा. ठोकूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात 18 रोजी 01018 क्रमांकाची ही स्पेशल ठोकूर येथून सकाळी 12 वा. सुटून दुसऱया दिवशी पहाटे 5 वा. एलटीटीला पोहचेल. 15 डब्यांच्या या स्पेशल गाडीला कोकण मार्गावर पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.