क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
अभिषेक चेरेकरची हॅट्ट्रीक व किरण चौकाशीच्या गोलाच्या जोरावर एसआरएस अ संघाने राजाधिराज छत्रपती शिवाजीनगर संघाचा 4-1 असा पराभव करून एसआरएस हिंदुस्थान चषक पटकावित 51 हजाराचे बक्षीस मिळविले. अभिषेक चेरेकरला उत्कृष्ट खेळाडू तर यश सुतारला उत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संभाजी उद्यान येथे झालेल्या या सीक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना एसआरएस अ व जेडीवायएम या संघात झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. शेवटी पंचांनी टायब्रेकर नियमाचा अवलंब केला. त्यामध्ये एसआरएस अ संघाने 2-1 असा विजय मिळविला. किरण चौकाशी, अभिषेक चेरेकर यांनी गोल केले तर जेडीवायएमतर्फे विकी जी. याने गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात राजाधिराज संघाने आचार्य इन्स्टिटय़ूट बेंगळूर संघाचा पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांना निर्धारीत वेळेत गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे पंचानी टायब्रेकर नियमाचा अवलंब केला. त्यामध्ये राजाधिराजने 3-1 असा विजय मिळविला. राजाधिराजतर्फे समर्थ बांदेकर व धनंजय एस., ओम रूपचंदानी यांनी गोल केले तर बेंगळूरतर्फे अमानने गोल केला.
अंतिम सामन्याचे उद्घाटन चंद्रकांत कोंडूसकर, श्रीकांत कुरियाळकर, योगेश पाटील, यश संचेतीता, विकास चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांना दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. अंतिम सामन्यात एसआरएस अ कोनवाळगल्ली संघाने राजाधिराज संघाचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात अभिषेक चेरेकरने 2 व किरण चौकाशीने 1 गोल करून पहिल्या सत्रात 3-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात अभिषेक चेरेकरने तिसरा गोल करून 4-1 ची आघाडी मिळवून दिली. राजाधिराजतर्फे समर्थ बांदेकरणे गोल करून 1-4 अशी आघाडी कमी केली बक्षिस वितरण चंद्रकांत कोंडूसकर, श्रीकांत कुरियाळकर, योगेश पाटील, यश संचेतीता यांच्या हस्ते विजेत्या एसआरएस अ कोनवाळगल्ली संघाला 51 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या राजाधिराज शिवाजीनगर संघाला 21 हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विनोद होसुरकर, इव्हॉन कोठारी व संतोष हुबळी यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बलराम शिंदोळकर, ओंकार शिंदोळकर व सहकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.