ग्रामस्थात संताप-विलगीकरण कक्षात रवानगी
वाकरे / प्रतिनिधी
कोपार्डे ( ता. करवीर) येथे सोमवारी रात्री उशिरा दिल्ली येथील तबलिगी जमातीच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले मात्र होम क्वारंटाईन पूर्ण केलेले दोन तरुण आल्याचे समजताच ग्रामस्थांत प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. सदरच्या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाल्याने त्यांची रवानगी एक विलगीकरण कक्षात करण्यात आली. कोपार्डे येथील दोन तरुण तबलिगी जमातीचा कार्यक्रम करून हेर्ले येथील एका मशिदीतील कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन जाहीर झाला व तबलिगीच्या मरकजमधून आलेल्या विशिष्ट जमातीतील व्यक्तींमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचेसमोर आल्याने हे दोन युवक हेर्ले येथेच होमकॉरंटाईन झाले होते.
तेथील होमक्वारंटाईन संपल्यानंतर सदरचे तरुण सोमवारी रात्री उशिरा कोपार्डे येथे आले. मंगळवारी सकाळी या युवकांच्या बाबतीत ग्रामस्थांना माहिती मिळाली. त्यामुळे गावात या तरुणांविषयी संताप निर्माण झाला. शेवटी ग्रामस्थांनी याची माहिती ग्रामपंचायत, कोरोना समिती, पोलीस पाटील यांना दिली आणि त्यांना सीपीआर येथे पाठवण्याचा आग्रह धरला. या तरूणांनी आपण होमकॉरंटाईनचा कालावधी पुर्ण केला असल्याचे सांगितले. पण असे असले तरी ग्रामस्थांनी त्यांना दुसऱ्या गावात जाताना संस्थात्मक कॉरंटाईनची अट घातली आणि विलगीकरण करा असा आग्रह धरला. शेवटी त्यांना स.ब. खाडे महाविद्यालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.