प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेली बैठक कोरमअभावी रद्द झाली. बैठकीची नोटीस पंधरा दिवस आधी पाठवूनदेखील चौथ्यांदा बैठक रद्द झाली. नोव्हेंबरपासून बैठक झाली नसल्याने अर्थसंकल्प मंजूर झाला नाही. तसेच विविध विकासकामेदेखील ठप्प झाली असून बुडातील अंतर्गत राजकारणामुळे बैठक होत नसल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
बुडा कार्यालयाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात मंजूर केला जातो. पण आतापर्यंत तीन बैठका कोरमअभावी रद्द झाल्या असून बैठकीची नोटीस पंधरा दिवसाआधी देऊनही चौथ्यांदा आयोजित करण्यात आलेली बैठक कोरमअभावी रद्द झाली. त्यामुळे अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली नाही. वास्तविक पाहता फेब्रुवारी व मार्च अखेरपर्यत अर्थसंकल्प मंजूर केला जातो. पण सप्टेंबर संपत आला तरी अर्थसंकल्प मंजूर झाला नाही. अर्थसंकल्पाविना बुडाचे कामकाज सुरू आहे. तसेच कणबर्गी योजनेच्या आराखडय़ाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे याविषयावर बुडाच्या बैठकीत चर्चा करून योजनेचे काम सुरू करण्याचा प्रस्ताव होता. पण बैठक होत नसल्याने कणबर्गी योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे आता बुडाच्या बैठकीला कधी मुहूर्त मिळणार? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
बुडाच्या सभागृहात एकूण 16 सदस्य असून कोरमकरिता 9 सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे. पण सोमवारच्या बैठकीवेळी अध्यक्ष, सरकारनियुक्त एक सदस्य आणि बुडाचे अधिकारी असे मोजकेच 5 ते 6 सदस्य उपस्थित होते. आमदार व अन्य सरकारनियुक्त सदस्यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने कोरम झाले नाही. त्यामुळे अध्यक्षांनी ही बैठक रद्द केली.
बुडातील अंतर्गत राजकारणामुळे बुडाच्या बैठकीकडे पाठ फिरविण्यात आली असून बुडा अध्यक्षांच्या कामकाजाबाबत नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच बैठक होत नसल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. तर बुडा अध्यक्षांना हटविण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली होती. त्याचप्रमाणे आता अध्यक्ष बदलासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. पण यामुळे बुडाचे कामकाज ठप्प झाले आहे.