प्रतिनिधी/ गोडोली
ग्रामविकासाचा दुवा असलेले ग्रामसेवक आज अनेक जबाबदाऱया यशस्वीपणे संभाळत आहेत. कोरोनाच्या संकटात सामाजिक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱया ग्रामसेवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरेगाव तालुक्यातील ग्रामसेवकांचा नेहमीच अभिमान वाटतो, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी केले.
कोरोनाचे संकट गडद होत असून भविष्यात रक्ताची गरज लागू शकते. याचा विचार करून कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने स्वयंस्फूर्तीने दि. 8 मे रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांनी स्वतः रक्तदान करून केले. यावेळी तालुक्यात कार्यरत असलेल्या ग्रामसेवक, काही सरपंच आणि पंचायत समितीचे कर्मचारी अशा तब्बल 54 व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केल्याची माहिती तालुकाध्यक्ष अभिजीत चव्हाण यांनी सांगितले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी राज्य कौन्सिलर सारिका पवार, उपाध्यक्ष निलेश बर्गे, ग्रामसेवक पतसंस्था संचालक आबासाहेब बर्गे, तालुका सचिव अंकुश टेबरे, महिला उपाध्यक्ष तृप्ती जाधव, सहसचिव माया इंगवले, कोषाध्यक्ष गणपत खलाटे, कायदेशीर सल्लागार विजय ढाणे, समाधान माने यांनी परिश्रम घेतले.