प्रतिनिधी / सांगली
जिल्हय़ात शनिवारी नवीन 15 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या 632 झाली असून उपचारातील रूग्णसंख्या 310 झाली आहे. तर यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील 52 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. हा जिल्हय़ातील 17 वा बळी ठरला आहे.
सांगली-मिरजेत रूग्णसंख्या वाढूच लागली
सांगली शहरातील विजयनगर येथील कृष्णाली वसाहत येथे राहणाऱया एका खासगी डॉक्टर महिलेस कोरोनाची लागण झाली आहे. तर वारणाली रोडवरील आमंत्रण हॉटेलजवळ राहणाऱया 36 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाली. खणभाग भांडवले गल्ली येथील 42 वर्षीय व्यक्ती, तसेच दत्तनगर येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. सांगली शहरात एकूण पाच रूग्ण आढळून आले आहेत. मिरजेतील रेवणी गल्लीतील 25 वर्षीय युवक बाधित आढळून आला आहे. तर इतर भागातील दोन असे एकूण मिरजेत तीन रूग्ण वाढले आहेत. सांगली आणि मिरजेत मिळून एकूण आठ रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये बामनोळी येथील व्यक्तीचाही समावेश आहे.
बिळूर, कर्नाळ, कुची येथे रूग्ण वाढले
जत तालुक्यातील बिळूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. याठिकाणी शनिवारी तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामध्ये 38 वर्षीय व्यक्ती, 65 वर्षाची महिला आणि 15 वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे मुंबईहून आलेली 52 वर्षाची महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. कडेगाव येथील 70 वर्षाची व्यक्ती, मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील 36 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे.
सात जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात शनिवारी सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर परजिल्हय़ातील आज नवीन 11 रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे परजिल्हय़ातील रूग्णसंख्या 38 झाली आहे. उपचार सुरू असणाऱयामध्ये अथणी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ातील 17 वा बळी
कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील 52 वर्षीय व्यक्तीचा शनिवारी कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही व्यक्तीचा अहवाल शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक बनली. त्याच्यावर भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते पण हे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हा जिल्हय़ातील कोरोनाचा 17 वा बळी गेला आहे.
11 जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी 11 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱयामध्ये जुना बुधगाव रोडवरील 65 वर्षीय व्यक्ती, कानकात्रेवाडी येथील 48 वर्षीय व्यक्ती, नेलकरंजी येथील 55 वर्षीय व्यक्ती, दरीबडीची येथील 28 वर्षीय युवक, जत येथील 32 वर्षीय व्यक्ती, उमदी येथील 40 वर्षीय व्यक्ती, मिरज येथील 73 वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील येळापूर येथील 38 वर्षीय व्यक्ती, कर्नाळ येथील 36 वषीय व्यक्ती या नऊजणांचा समावेश आहे. तर परजिल्हय़ातील दोन रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दारूच्या दुकानासमोर तोबा गर्दी
जिल्हय़ात कोरोनाचे रूग्ण मोठय़ा संख्येने वाढत चालल्याने जिल्हय़ात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता सोशल मीडियातून व्यक्त करण्यात येत असल्याने तळीरामांनी पुन्हा लॉकडाऊन झाला तर आपणास दारू मिळणार नाही, या भीतीपोटी दारू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. दुकान बंद झाले तरी तळीराम दारू देण्याची मागणी करीत होते.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 632
बरे झालेले 305
उपचारात 310
मयत 17