ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर आता एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. असे असले तरी देशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोकं वर काढले आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचे लसीकरण करणे आवश्यक आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.
त्यामुळे निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय आणि खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
तसेच लसीकरणाचा वेग वाढवला तरी लशीचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी राज्यांनी लसीकरणाची अद्ययावत आकडेवारी केंद्राला देणे गरजेचे असून, त्यानुसार लशींचा पुरवठा केला जाईल, असेही केंद्राने सर्व राज्यांना म्हटले आहे.