
प्रतिनिधी /पणजी :
राज्यात कोरोनाचा झंजावात सुरू असून अनेक भागात अक्षरश: कोरोनाने थैमान घातले आहे. मागील सर्व विक्रम मोडीत काढून काल गुरुवारी नवा विक्रम स्थापित केला आहे. काल तब्बल 713 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले तर 8 जणांचा मृत्यू झाला. सांखळी, फोंडा, मडगाव, पेडणे, पर्वरी या भागात कोरोना रुग्णांमध्ये झपाटय़ाने वाढत होत आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती सध्या नियंत्रणाबाहेर पोचली आहे.
नवी एसओपी घातक ठरण्याची शक्यता
नव्या एसओपीनुसार बरीच शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे आंतरराज्य वाहतूक नियंत्रणाविना सुरू झाली आहे. गोव्यात परराज्यातून मोठय़ा प्रमाणात खासगी वाहनातून पर्यटक येत आहेत. बार, रेस्टॉरंट खुली झाली आहेत. त्यामुळे बाहेरून येणारे पर्यटक गोव्यात कोरोना वाढविण्यास कारण ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता 4782 वर पोचला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 212 वर पोचली आहे. कोरोनाचा विळखा वाढत चालल्याने लोकांमध्ये प्रचंड दहशत वाढली आहे. शहरी भागासह निमशहरी भाग आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा वाढला आहे.
आरोग्य केंद्रनिहाय कोरोना रुग्णसंख्या

मडगाव 446
वास्को 286
फोंडा 357
सांखळी 249
पेडणे 207
पर्वरीची 254
डिचोली 95
वाळपई 159
म्हापसा 207
पणजी 224
हळदोणा 117
बेतकी 147
कांदोळी 83
कासारवर्णे 42
कोलवाळ 143
खोर्ली 137
चिंबल 143
शिवोली 125
मये 75
कुडचडे 135
काणकोण 117
बाळ्ळी 93
कासावली 116
चिणचिणी 38
कुठ्ठाळी 118
कुडतरी 85
लोटली 83
मडकई 46
केपे 121
सांगे 54
शिरोडा 95
धारबांदोडा 71
नावेली 104
गोव्यात 3 सप्टेंबरपर्यंतचे कोरोनाबाधित 19355
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 14361
उपचार घेणारे सक्रिय रुग्ण 4782
3 रोजीचे नवे रुग्ण 713
3 रोजी बरे झालेले रुग्ण 302
3 रोजी मृत्यू 8
आतापर्यंतचे एकूण मृत्यू 212
………………………………………………………………………………………………………..
राजधानीत गुरुवारी 42 कोरोनाबाधित
प्रतिनिधी /पणजी :
राजधानी पणजी दिवसेंदिवस कोविडग्रस्त बनत चालली आहे. गुरुवारी एकाच दिवशी आतापर्यंतचे सर्वांधिक 42 कोरोना रुग्ण सापडले. पणजी शहरातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 224 वर पोहोचला आहे. पणजी महानगरपालिकेतर्फे कोरोनाबाधित सापडलेली घरे, सोसायटी व इतर ठिकाणांचे निर्जुंतुकीकरण करण्यात येत असून वाढत्या संख्येमुळे पालिकेवरही ताण पडत आहे.
रुग्णसंख्येमध्ये महिला, पुरुषांसह लहान मुले तसेच मध्यमवयीन, वृद्ध अशा सर्वांचा सहभाग आहे. आधी ज्या ठिकाणी रुग्ण सापडले तेथे आजूबाजूला शेजारी पाजारी कोरोनाचे संक्रमण होऊन रुग्ण वाढत आहेत. ते विविध ठिकाणी कामाला, नोकरीला असून तेथेही संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकाच घरात, सोसायटीत रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठे आहे.
मिलिटरी हॉस्पिटल कंपाल येथे 10 कोरोनाचे रुग्ण सापडले असून ते हॉस्पिटल कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. भाटले, मळा, तांबडी माती, फोंडवे-रायबंदर, मडकईकरनगर भाटले, कंरजाळे, दोनापावला, मिरामार, सांतइनेज व इतर भागात रुग्ण मिळत असून ते वाढत आहेत. या वाढत्या संख्येमुळे राजधानी पणजीतही चिंता वाढत चालल्याचे दिसून येत आहे.