ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, केरळ आणि पंजाबमधील नागरिकांना कोरोना नेगेटिव्ह अहवाल असेल तरच दिल्लीत प्रवेश दिला जाणार आहे.

दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी या पाच राज्यांतील नागरिकांना RT-PCR अहवाल सादर करावा लागेल. नागरिकांना किमान 72 तासापूर्वीचा RT-PCR सादर करावा लागणार आहे. 26 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून 15 मार्चपर्यंत तो लागू राहील.
दिल्ली सरकारचा हा निर्णय फ्लाइट, ट्रेन आणि बसच्या (सार्वजनिक वाहतूक) माध्यमातून प्रवास करणाऱ्यांसाठी लागू होणार आहे. पण जर खासगी गाडी वा कारने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना हा नियम लागू होणार नाही.
दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी सर्वाधिक 6,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती आणि नागपूरमध्ये कोरोना प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे.