लस उपलब्ध होईपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची लाट पुन्हा येत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या लाटेमुळे गंभीर समस्या उद्भवली आहे. याला आळा घालायचा असेल तर प्रत्येकाने काळजी घेणे काळाची गरज आहे. सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझर यांचा वापर काटेकोरपणे करावा, असे आवाहन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
कोविड-19 वर अद्याप लस नाही. लस लवकर आल्यास वितरण करण्याची तयारी सरकारने केली आहे. प्रत्येक नागरिकांपर्यंत ही लस पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. असे असले तरी तोपर्यंत कोरोनाच्या नियमांचे पालन प्रत्येकाने करावे, असे त्यांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर जिल्हाधिकाऱयांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 1 जानेवारीपासून शाळा-महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यादृष्टीने सरकारने सर्व ती तयारी केली आहे. शाळांमध्ये पथक नेमण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येकानेच आता काळजी घेणे महत्त्वाचे असून यापूर्वी ज्याप्रकारे जनतेने सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य पुढेही करावे, असे आवाहनही त्यांनी केले.