मृतांची संख्या 109 : तबलिगमुळेच देशभर प्रसार : कठोर कारवाईस प्रारंभ : दीपप्रज्वलनाला देशभर अभूतपूर्व प्रतिसाद
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रविवार संध्याकाळ ते सोमवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 4 हजार 67 पर्यंत पोहचली आहे. तसेच मृतांची संख्याही 109 झाली आहे. तबलिग जमात या इस्लामी संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या तबलिगी रुग्णांची संख्याही 1475 पर्यंत पोहचली आहे. याच संघटनेमुळे देशभर कोरोनाचा प्रसार झाला, ही बाब आता अधिकाधिक स्पष्ट होऊ लागल्याने देशभर संतापाची लाट उसळली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरूद्धच्या लढाईसाठीचा उत्साह वाढावा यासाठी रविवारी रात्री 9 वाजता दीपप्रज्वलन करण्याचे आवाहन साऱया देशवासीयांना केले होते. त्याला देशभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व स्तरांमधील लोकांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल सोमवारी पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार मानले. एकीकडे देशद्रोहय़ांसमोर शेपटी घालणाऱया पण दुसरीकडे देशाच्या पंतप्रधानांवरच आवाज चढवून टीका करणाऱया भेकड पुरोगाम्यांना, आपण पंतप्रधानांसोबतच आहोत असे दाखवून देत जनतेने सणसणीत चपकार ठेवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया देशभर उमटत आहे.
तबलिगचा वाटा सर्वाधिक

गेल्या आठवडाभरात देशात झालेल्या कोरोना प्रसाराला तबलिग ही इस्लामी संस्था प्रामुख्याने जबाबदार आहे, असे आता अनेक राज्यांच्या प्रशासनांनीही स्पष्ट केले आहे. देशाच्या किमात 80 जिल्हय़ांमध्ये याच संघटनेमुळे कोरोनाचे सुरवातीचे रुग्ण तयार झाले आणि नंतर त्यांनी त्या जिल्हय़ांमध्ये हा आजार पसरविला, ही सत्यस्थिती उघड होत आहे. देशातील एकंदर रुग्णांच्या संख्येत तबलिगशी संबंधित रुग्णांची संख्या तब्बल 33 टक्के आहे. भारताची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 4.1 आठवडय़ाचा आहे. तबलिगचे रुग्ण नसते तर वेग 7.4 आठवडे असा लांबला असता, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
पुरूषांमध्ये अधिक
कोरोना रुग्णांमध्ये पुरूषांची संख्या 73 टक्के, तर महिलांची संख्या 27 टक्के आहे. आजवर झालेल्या मृत्यूंमध्ये 63 टक्के मृत्यू हे 60 वर्षांहून अधिक वयाच्या रुग्णांचे आहेत. त्यामुळे हा आजार पुरूष आणि वृद्धांना अधिक प्रमाणात बळी पाडतो हे स्पष्ट होत आहे. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी दिली.
कोंबडे झाकले तरी सूर्य उगवतोच
देशात सध्या धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱया अनेकांनी तबलिग या इस्लामी संघटनेला आपली ढाल पुरविण्याचे काम सुरू केले आहे. त्यांनी या संघटनेसमोर शरणागती पत्करून उलट पंतप्रधान मोदी व प्रशासनाविरोधातच आकांडतांडव सुरू केले आहे. जनतेने दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून अशा व्यक्तींना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशीही चर्चा आहे.
महाराष्ट्रच आघाडीवर
देशात रुग्णसंख्येत महाराष्ट्रच आघाडीवर आहे. या राज्यातील रुग्णांची संख्या 800 हून अधिक झाली असून ती देशाच्या रुग्णसंख्येच्या 20 टक्के आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या 500 हून अधिक आहे. मृतांच्या संख्येतही महाराष्ट्रच 45 या आकडय़ासह आघाडीवर आहे. केरळ रुग्णसंख्येत दुसऱया क्रमांकावर (563 रुग्ण) असून मृतांच्या संख्येत 5 व्या स्थानी आहे.
7 लाख किट्स् पुरविणार
येत्या दोन दिवसांमध्ये (8 एप्रिलपर्यंत) 7 लाख जलदगती चाचणी किट्स् आयसीएमआरकडून मागविली जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने ही किट्स् मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यातच 5 लाख मिळणार आहेत, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. चाचण्यांचा वेग आठवडय़ाला दुप्पट या प्रमाणात वाढविणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे.