प्रतिनिधी/ पणजी
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून सामाजिक संसर्ग सुरु झालेल्या गोव्यात काल शनिवारी तब्बल 89 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गोवा कोविड-19 च्या तिसऱया टप्प्यात पोहोचण्याची शक्यता आहे. गावोगावी कोरोना फैलावत चालला असून रुग्ण सापडताच लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था घेत आहेत. काल शनिवारी मोठय़ा प्रमाणात रुग्ण सापडल्याने उपचार घेणाऱया रुग्णांची संख्या आता 706 वर पोहोचली आहे.
मांगोरहिलमधील कोरोनाबाधितांची संख्या 267
हॉटस्पॉट ठरलेल्या मांगोरहिलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 267 झाली आहे तर मांगोरहिलसंबंधित रुग्णांची संख्या 217 झाली आहे. वास्कोतील विविध भागातील रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सडा वास्को येथील रुग्णसंख्या 61 तर बायणा येथील रुग्णसंख्या 41 झाली आहे. वाडे येथील रुग्णसंख्या 27 तर झुवारीनगरमधील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 24 झाली आहे. चिंबल येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 25 तर मोर्ले सत्तरीतील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या रुग्णसंख्या 21 झाली आहे. कुडतरी येथील रुग्णसंख्या 31 एवढी झाली आहे. आंबेलीशी संबंधित रुग्णसंख्या 31 वर पोहोचली आहे. केपेतील रुग्णसंख्या 10, लोटलीतील रुग्णसंख्या 11, म्हापसातील 6, सांखळी येथेही एक रुग्ण सापडल्याने आकडा 6 वर पोहोचला आहे.
50 रुग्ण कोरोनामुक्त
दरम्यान, काल आणखी 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण 2237 जणांची चाचणी करण्यात आली होती. 1240 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 908 जणांचे अहवाल यायचे आहेत.
सरकारवर दबाव वाढू लागला
कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने गोव्यात भीतीची छाया वाढत चालली आहे. त्याचबरोबर सरकारवरील दबावही वाढत चालला आहे. लोकांनी आता ज्या भागात रुग्ण सापडतात तेथे स्वेच्छेने लॉकडाऊन सुरु केले आहे. सरकार लॉकडाऊन करण्यास तयार नाही, मात्र लोक स्वतःच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करत आहेत. सरकार लॉकडाऊनला का विरोध करत आहेत असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाला आहे. गोवा ग्रीन झोनमध्ये असताना सरकारने सुमारे दीड महिन्याचे लॉकडाऊन केले तर आता कोरोना झपाटय़ाने वाढत असताना सरकार लॉकडाऊन करायला तयार नाही.