पंढरपूर \ ऑनलाईन टीम
मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा, असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे. भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत केले आहे.
भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केलं. भारतनानाही येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील, असा विश्वासही कोल्हे यांनी व्यक्त केला.
काल खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरून व्हर्च्युअल सभा घेत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सभा गाजवली. यावेळी त्यांनी भगीरथ भालके यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.