प्रतिनिधी / कोल्हापूर
राजारामपुरी शाहूनगर येथील भाजी मार्केट समोरील वसाहतीतील विवाहिता माहेरी गेली होती. तीन दिवसांपुर्वी ती कोल्हापुरात आली. 15 रोजी तिचा स्वॅब घेतला होता. त्याचा रिपोर्ट रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ती रहात असलेल्या घरापासून शाहूनगरातील 30 मीटर परिसर सोमवारी प्रशासनाने सील केला. कंटेनमेंट घोषित केले असून तेथे औषध फवारणी सुरू आहे.
शाहूनगर भाजीपाला मार्केटसमोरच्या वसाहतीत 14 जणांचे कुटुंब रहाते. या कुटुंबातील 38 वर्षीय विवाहिता लॉकडाऊनपुर्वी सातारा येथे माहेरी गेली होती. ऑनलाईन नोंदणीनंतर 14 मे रोजी ती पतीसमवेत कोल्हापुरला सासरी आली. 15 रोजी तिची सीपीआरमध्ये तपासणी केली. रविवारी रात्री त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळ प्रशासनाने ती रहात असलेल्या घरापासून 300 मीटरचा परिसर कंटेनमेंट घोषित केला आहे. या परिसरात येणारे सर्व मार्ग बॅरिकेटस् लावून बंद केले आहेत. तसेच औषध फवारणीही सुरू आहे. कंटेनमेंट क्षेत्रात शाहूनगर म्हसोबा मंदिर ते राजारामपुरी मारूती मंदिर, शाहूनगर भाजीपाला मार्केट, लकी बाजार, पांजरपोळचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेली महिला भाजी विक्रेती असल्याचे समजते.

