जिल्हाधिकाऱयांचे आवाहन : खासगी इस्पितळ संघटनांच्या पदाधिकाऱयांची घेतली बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावातील कोविड इस्पितळाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी खासगी इस्पितळ संघटनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला खासगी इस्पितळ संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
सरकारच्या धोरणाप्रमाणे खासगी इस्पितळात कोरोना रूग्णांसाठी 50 टक्के बेड्स राखीव ठेवणे, बेडच्या उपलब्धतेबद्दल अपडेट्स यावर याबैठकीत चर्चा करण्यात आली. खासगी इस्पितळात सध्या ऑक्सिजनची समस्या नाही. रूग्णांना योग्य उपचार देण्यात येत आहेत. उपचारांचे शुल्क आकारताना समस्या येत आहे. सरकारने निर्धारित केले शुल्क समाधानकारक नाही. तथापि ते सुधारण्याची विनंती सरकारला केली आहे. कोणत्याही परिस्थिती सरकारला सहकार्य देण्यास खासगी इस्पितळे सज्ज आहेत. असे खासगी इस्पितळ संघटनेचे सचिव डॉ. दैवेगौडा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
खासगी इस्पितळांच्याबाबतीत बैठकीत उपयुक्त चर्चा झाली. उपचार शुल्क आकारताना काही कमी – जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे शुल्काची काही रक्कम आगाऊ भरणा केल्यास उपचार करणे सोपे जाते अशा सूचना करण्यात आल्या. खासगी इस्पितळांमध्ये उत्तम उपचार आणि सुविधा देण्यासाठी सरकारने शुल्कात सुधारणा केली पाहिजे. सरकार आणि खासगी इस्पितळाच्या सहकार्यामुळेच रूग्णांना उत्तम उपचार देता येतील अशी आमची भूमिका आहे असे खासगी इस्पितळ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
एकंदर जिल्हाधिकाऱयांनी खासगी इस्पितळांसोबत घेतलेल्या या बैठकीत कोरोना रूग्णांवर उपचार, सुविधा, उपचार शुल्क आदींवर चर्चा करण्यात आली. मात्र सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी यावेळी केले.