ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील आघाडीच्या बायोटेक कंपन्या बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींचा आढावा घेण्यासाठी 64 देशांचे प्रतिनिधी आज भारत दौऱ्यावर आहेत. हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीत ते दाखल झाले असून, ते लसीच्या निर्मितीचा आढावा घेत आहेत. भारत बायोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णा एला यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना अभियानात काम करणारे 64 देशांचे प्रतिनिधी भारत बायोटेकच्या लसीचा आढावा घेतल्यानंतर इतर शहरातील कंपन्यांना भेट देतील. परदेशी प्रतिनिधींच्या तुकडीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, अफगाणिस्तान, डेन्मार्क, इराण, भूटान, ब्राझील, म्यानमार, स्लोवेनिया, त्रिनिदाद, टोबॅगो आणि श्रीलंकेसह अन्य देशातील प्रतिनिधींचा समावेश आहे.
दौऱ्याबाबत लुक्झेंबर्ग येथील ‘बी मेडिकल सिस्टिम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एल. प्रोवोस्ट म्हणाले, कोरोना लस साठवण्यासाठी लुक्झेंबर्गमधून कोल्ड स्टोरेजचे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी आणि निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी मी भारत दौऱ्यावर आलो आहे. या प्रकल्पासाठी आम्ही गुजरातमधील जागेची पाहणी करणार आहे.