‘स्वदेशी लसीची मानवी चाचणी सुरू’ : आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्विटने आशा पल्लवित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोनाचे संकट सातत्याने वाढत असतानाच आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीसंदर्भात शुभवार्ता दिली आहे. त्यांनी शनिवारीच सोशल मीडियावर ‘स्वदेशी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू झाली आहे!’ असे ट्विट केल्याने लवकरच लस येण्याचे संकेत मिळाले आहेत. कोरोनाविरुद्धची लढाई आता निर्णायक अवस्थेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लसीच्या विकासासाठी चालू असलेल्या प्रयत्नांची सकारात्मक चिन्हे आहेत. आम्हाला लवकरच या साथीवर पूर्ण विजय मिळेल, असा दावा त्यांनी केल्यामुळे देशवासियांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्विटमुळे लवकरच कोरोना लस देशात तयार होईल अशी आशा आहे. आरोग्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये मानवी चाचणी देशात दोन टप्प्यात सुरू असल्याचे नमूद केले आहे. या लसीचा कोणताही विपरित परिणाम रुग्णांवर दिसून आलेला नाही, असेही ते म्हणाले. याव्यतिरिक्त 14 संशोधन संस्थांकडूनही लसीची चाचणी घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. कोरोना विषाणूची लस 15 ऑगस्टपर्यंत देशात सुरू केली जाईल असा अंदाज जुलैच्या पहिल्या आठवडय़ात आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी व्यक्त केला होता.
हरियाणाच्या रोहतकमध्ये भारत बायोटेकने तयार केलेल्या लसीचा डोस तीन जणांना देण्यात आला आहे. पाटणा येथील एम्स रुग्णालयातही कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू झाली आहे. त्यांना दोनदा लसीचा डोस दिला जाईल आणि 28 दिवसांनी त्यांची तपासणी केली जाईल. भारतात जायडस कॅडिला आणि भारत बायोटेक या औषधनिर्मिती करणाऱया कंपन्यांनी लसीची मानवी चाचणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत आरोग्यमंत्र्यांचे हे ट्विट खूप महत्वाचे मानले जात आहे.
सीरम इन्स्टिटय़ूटही आघाडीवर
भारतातील सर्वात मोठी लस तयार करणारी कंपनी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया देखील लस तयार करण्यात सामील आहे. लस निर्मितीत सीरम इन्स्टिटय़ूट ‘युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड’ची भागीदार आहे. त्यांच्याकडून संयुक्तपणे अनेक चाचण्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर बाजारात उपलब्ध व्हावी असा त्यांचा प्रयत्न आहे.
चीनसह अनेक देश लसनिर्मितीत प्रगतीपथावर
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लसींचा शोध सुरू आहे. अनेक देशांकडून लसीची चाचणी प्रगत टप्प्यात आली आहे. जागतिक स्तरावर चिनी कंपनीने सायनोफॉर्मच्या लसीने मानव चाचणीच्या तिसऱया टप्प्यात प्रवेश केला आहे. चाचणीच्या तिसऱया फेरीत पोहोचणारी ही जगातील पहिली कोविड-19 लस आहे, असा दावा केला जात आहे. जगभरात 1,300 हून अधिक लसींची पूर्वतयारी सुरू असून त्यांच्या वेगवेगळय़ा वैद्यकीय चाचण्या सुरू असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला मोठे यश
कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीमध्ये सर्वात पुढे असलेल्या ऑक्सफोर्डला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने ब्रिटनच्या प्रमुख फर्म्ससोबत हातमिळवणी करत ‘गेम चेन्जिंग अँटीबॉडी टेस्ट किट’ तयार केली आहे. या किटला एका प्रमुख चाचणीमध्ये यश मिळाले आहे. या चाचणीद्वारे अगदी कमी वेळेत असंख्य लोकांची चाचणी करणे शक्मय होईल. नवीन अँटीबॉडी टेस्ट किटमुळे लोक घरीच चाचणी करू शकतील. स्वतंत्र प्रयोगशाळेची आवश्यकता भासणार नाही. ऑक्सफोर्डच्या या प्रयत्नांना ब्रिटन सरकारचे समर्थन दिले आहे. आता सरकार या अँटीबॉडी टेस्ट किटचे मोठय़ा प्रमाणात वितरण करण्याची योजना आखत आहे. येत्या काही दिवसातच या किटला अधिकृत मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत.