मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर चिपळूणमधील व्यापारी आणि नागरिकांना केंद्र सरकारकडून मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिलं. मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे आहेत का पाहायला पाहिजे. आल्यापासून कोरोना, वादळ आणि पाऊस संकट येत असल्याची टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नारायण राणे यांना राज्यात मागील दोन वर्षांपासून सतत संकट येत आहेत असा प्रश्न करण्यात आला होता यावर राणेंनी उत्तर दिलं आहे. राज्यातील भयावह परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहे. याला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. आल्यापासून वादळ, पाऊस सर्व सुरु आहे. कोरोना त्यांची देण असल्याचा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले पाय बघायला पाहिजे, पांढऱ्या पायाचा अशी खोचक टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
पाठांतर करून यायचं आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचं. या राज्यात मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. लोकं चार दिवसांपासून अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवं होतं. जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारने करायला हवं होतं. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे., असा निशाणाही त्यांनी साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठसूठ केंद्राकडे मदतीचा हात पसरवतात यावर नारायण राणे यांनी टीका केली आहे. राज्य चालवायला आमच्या हाती द्या, आम्ही वेटींगवर बसलो आहे. केंद्र सरकार सातत्याने मदत करत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत कबुली दिली आहे. आज मुख्यमंत्री विनम्र झाले आहेत. अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
Related Posts
Add A Comment