मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना संक्रमित दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला शुक्रवारी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. सचिनची 27 मार्चला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगीरीचा उपाय म्हणून सचिन रूग्णालयामध्ये भरती झाला आहे. रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
कोरोनाची लागण झाल्यावर सचिन घरातच क्वारंटाईन होता. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र आज ट्विट करत त्याने आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगितले आहे. सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या तसेच त्याची तब्येत लवकरात लवकर पूर्ववत व्हावी, अशा मनोकामना व्यक्त केल्या. आजच्या ट्विटच्या माध्यमातून सचिनने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
सचिनने ट्विट करत म्हटले आहे की, , “शुभेच्छा आणि प्रार्थनेसाठी आभारी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे. मला आशा आहे की पुढील काहीच मी घरी परतेन. तुम्हीही तुमची काळजी घ्या, सुरक्षित रहा.
काही दिवसापूर्वी रायपूर येथे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज क्रिकेट स्पर्धेत सचिनने इंडिया लीजेंड्स संघाचे नेतृत्व केले होते. कर्णधार सचिनच्या नेतृत्वात इंडिया लीजेंड्स संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका लीजेंड्स संघाचा पराभव केला होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर सचिन मुंबईत परतला परतल्यानंतर केलेल्या कोरोना चाचणीत सचिन कोविड पॉझिटिव्ह आढळला होता. यानंतर ट्वीट करत सचिनने कोरोना झाल्याची माहिती दिली होती.