भारतीयांसह जगात बहुतांश देशांमध्ये दिसून आला महत्वपूर्ण बदल : खरेदीसह बँकिंग व्यवहारांमध्ये मोठी वाढ
जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या विळख्यानंतर लोकांच्या दैनंदिन व्यवस्थेबरोबरच आचार-विचारांमध्येही फरक पडल्याचे आता सहा महिन्यानंतर स्पष्टपणे दिसून येऊ लागले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अनेक देशांनी सुरुवातीच्या टप्प्यात ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी केली होती. ‘लॉकडाऊन’मुळे घरातच अडकलेल्या लोकांनी खरेदी, बँकिंग व्यवहारासह अन्य सेवांसाठी ऑनलाईन देव-घेव व्यवहारांचा आधार घेतल्यामुळे आता लोकांना त्याची सवयच झाल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे.
ब्रिटनच्या स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने केलेल्या सर्वेक्षणातून कोरोना संसर्गानंतर झालेले परिणाम दिसून आहे. भारतासह ब्रिटन, अमेरिका, हाँगकाँग, इंडोनेशिया, केनिया, चीन, मलेशिया, पाकिस्तान, सिंगापूर, तैवान, संयुक्त अरब अमिरात या 12 देशांमधील 12,000 लोकांचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
कोरोनाच्या विळख्यानंतर अवघ्या जगभरातील सर्व घटकांमधील नागरिकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. एकूण सामाजिक वर्तन आणि आर्थिकदृष्टय़ाही हे बदल झाल्याचे अनेक सर्वेक्षणातून पुढे येत आहे. हे सर्वेक्षण दोन टप्प्यात झालेले आहे. आणखी तिसऱया टप्प्यावरील सर्वेक्षण अजूनही चालू आहे. एकूणच जगभरात कोरोना विषाणूमुळे मोठे बदल पाहायला मिळत असल्याचे यामुळे अधोरेखित झालेले आहे. भारतीय मंडळी लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी सुमारे 54 टक्के इतक्मया प्रमाणात ऑनलाईन खरेदीचा विचार करीत होते. आता तीच टक्केवारी थेट 69 झाली आहे. तर, 10 भारतीयांपैकी 9 जणांच्या खर्चावर थेट परिणाम झालेला आहे. सर्वेक्षणानुसार, 74 टक्के भारतीय ऑनलाईन शॉपिंगवर सकारात्मक दिसत आहेत. मात्र, जागतिक पातळीवर ही संख्या केवळ 64 टक्के आहे.
किराणा-औषधांच्या मागणीत वाढ
सध्या कोरोना विषाणूमुळे होणाऱया कोविड 19 आजाराचा मुकाबला करण्यासाठीचा प्रयत्न जगभरात होत आहे. अशावेळी किराणा सामान, खाद्यान्न, आरोग्य उपकरणे, प्रतिकारशक्ती वाढविणारे खाद्यपदार्थ व औषधे यांचा वापर मात्र वाढला आहे.
भारतीयांचे खर्चावर नियंत्रण
लॉकडाऊन शिथील झाल्यापासून भारतीय लोकांचा खर्च वाढला आहे. पण तरीही कोरोना व्हायरस या साथीच्या आजारानंतर 90 टक्के लोक पूर्वीपेक्षा जास्त सावध राहत आहेत. जागतिक स्तरावर 75 टक्के लोक त्यांच्या खर्चाबाबत सावध झालेले आहेत. या सर्वेक्षणातूनच याबाबतची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात, जागतिक स्तरावर 46 टक्के लोक त्यांच्या खर्चाबद्दल सावध राहिलेले दिसले. जुलैमध्येच भारतासाठी ही आकडेवारी जवळपास 56 टक्के आहे.
उत्पन्न व खर्चावर थेट परिणाम
सध्या सगळेच लोक आर्थिक संकटाचा मुकाबला करीत आहेत. अशावेळी खर्चावर सगळय़ांनी नियंत्रण आणलेले आहे. गरीब व मध्यमवर्ग यांच्या खर्चावर परिणाम झालेला आहे. त्याचवेळी मुबलक पैसे असलेले किंवा इतर मार्गाने पैसे कमाविणाऱया मंडळींच्या खर्चात काहीही परिणाम झालेला दिसत नाही.
कॅशलेस ट्रान्झॅक्शन वाढण्याची अपेक्षा

कॅशलेस खर्चाच्या बाबतीत या क्षेत्रामध्ये भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 87 टक्के लोकांचे म्हणणे आहे की येत्या 5 वर्षात कॅशलेस खर्चात मोठी वाढ होईल. जागतिक स्तरावर केवळ 64 टक्के लोकांचा यावर विश्वास आहे. कोरोना कालावधीच्या तुलनेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रवास किंवा सुट्टी घेणे टाळले आहे, असे मत भारतातील 64 टक्के लोकांनी नोंदवले आहे. तर, 30 टक्के लोकांनी आपण खर्च कमी केला असल्याचे स्पष्ट केले. जागतिक पातळीवर ही संख्या 41 टक्के आहे. एकीकडे केवळ 56 टक्के लोकांनी नवीन कपडय़ांची खरेदी केली आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर ही संख्या 55 टक्के आहे.
मेक्सिको: दिवसात 490 बळी

मेक्सिको सरकार संक्रमणाची दुसरी लाट रोखण्यात अपयशी ठरले आहे. गुरुवारी येथे संसर्गामुळे 490 लोकांचा मृत्यू झाला. या छोटय़ा देशात आतापर्यंत 75 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नाही तर देशातील एकूण बाधितांचा आकडा 7 लाख 15 हजारच्या पुढे पोहोचला आहे.
फिनलँड : स्निफर डॉग तैनात

फिनलँडमधील हेलसिंकी विमानतळावर सरकारने स्निफर डॉग तैनात केले आहेत. त्यासाठी या डॉग युनिटला विशेष वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे स्निफर डॉग 10 मिनिटांत कोरोना संक्रमित लोकांना अचूकपणे ओळखणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या हे युनिट हेलसिंकी विद्यापीठाच्या देखरेखीखाली आहे.
‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ही स्पर्धेत

कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर प्रभावी लस शोधण्यासाठी विविध देशांकडून संशोधन सुरू असतानाच आता ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ कंपनीनेही लस निर्मितीच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. 60 हजार लोकांवर त्यांच्या औषधाची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सदर लस प्रभावी आहे की नाही हे डिसेंबरपर्यंत स्पष्ट होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही लस अद्ययावत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
फ्रान्स : संघर्ष सुरूच

फ्रान्स सरकारने देशातील पर्यटन शहर मार्सिलेमधील बार आणि रेस्टॉरंट्स बंद करण्याचे आदेश दिले. परंतु, स्थानिक प्रशासनाने ते स्वीकारण्यास नकार दिला आहे. येथील उद्योजकांच्या संघटनेने शहराच्या अस्मिता व सन्मानावर परिणाम होईल असे सांगत याला सामूहिक शिक्षा म्हणून संबोधले.
कॅनडा : दुसरी लाट सुरू

देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. येथे 1 लाख 47 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या आठवडय़ाभरात येथे तब्बल 7 हजार 500 नवे रुग्ण सापडल्यामुळे सरकारने नियमांमध्ये बदल करण्याचा विचार चालवला आहे.
कोरोना विषाणूचा ‘रुद्रावतार’

कोरोना विषाणूचे स्वरुप बदलून ते आता अधिक संसर्गजन्य बनले आहे. विषाणूंची संख्या आणि ताकद वाढल्यामुळे आता ते मास्कचा वापर किंवा हात धुणे यासारख्या बचाव प्रक्रियेतून मुक्त होऊ शकतात अशी भीती एका अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. अभ्यासानुसार, विषाणूच्या स्पाईक प्रोटीनची रचना बदलल्यामुळे हा फरक पडलेला दिसून येत आहे. बहुतेक लस व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनला ओळखतात. परिणामी आता कोरोना विषाणूचा प्रतिकार करताना नव्या अडचणी संभवू शकतात.
उपचार पद्धतीत बदल अपेक्षित
कोरोना विषाणूंनी आपले स्वरुप बदलल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. आपल्या लोकसंख्येच्या पातळीवर रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोना विषाणू अधिक संसर्गजन्य होण्याची शक्मयता असते. असे झाल्यास फ्लूसारखी परिस्थिती निर्माण होईल. विषाणूंची संख्या आणि ताकद वाढल्यामुळे आता आणखी प्रभावी उपचार आणि औषधांचा वापर करावा लागणार आहे, असे बोरन्स म्हणाले.