ऑनलाईन टीम / कोलकाता :
देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट अधिक भीतीदायक बनत चालली आहे. निवडणूक सुरू असलेले राज्य पश्चिम बंगाल व खासकरून कोलकातामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. खरंतर राज्याला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा फटका बसत आहे. कोलकातामध्ये केल्या जात असलेल्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये प्रत्येक दुसरा व्यक्ती कोरोना संक्रमित मिळत आहे. तर पूर्ण राज्याची आकडेवारी लक्षात घेतली तर प्रत्येक चौथा व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे.
- संसर्गाचा दर उच्च
कोलकाता आणि आजूबाजूच्या परिसरातील कोरोना संसर्गाचा दर 45 ते 55 % इतका आहे. हाच दर दुसऱ्या राज्यात 24 टक्क्यांच्या आसपास आहे. 1 एप्रिल रोजी राज्यातील 25,766 लोकांची चाचणी केली असता त्यातील 1274 लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी संसर्गाचा दर 5 टक्के इतका होता. पण 24 एप्रिल रोजी 55,060 लोकांची चाचणी केली असता त्यातील 14,281 जण पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच संसर्गाचा दर 25 % पेक्षा जास्त आहे.
- आज मतदानाचा सातवा टप्पा

सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. निवडणूक आयोगाने 8 टप्प्यात निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये 5 जिल्ह्यातल्या 36 जागांसाठी मतदान होईल. सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर अंतिम म्हणजेच आठव्या टप्प्यातले मतदान 29 एप्रिलला होणार आहे. तर मतमोजणी 2 मे रोजी केली जाणार आहे.