प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षण आंदोलनाचे बुधवारी राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरातून बुगल वाजणार आहे. मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या पुढाकाराने राज्यस्तरीय गोलमेज परिषद आयोजित केली असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी संयोजकांनी सानेगुरुजी वसाहत येथील रावजी सांस्कृतिक भवन येथे होणाऱया परिषदेच्या तयारीची पाहणी केली. राज्यभरातील 54 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यातील बहुतांश प्रतिनिधी मंगळवारीच दाखल झाले.
संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह विजयसिंह महाडिक, भरत पाटील, शिवाजीराव लोंढे, प्रसाद जाधव, विक्रमसिंह जरग, पुंडलिक जाधव, सचिन साठे यांनी गोलमेज परिषदेच्या ठिकाणाची पाहणी केली. बुधवारी दुपारी 12 वाजता या परिषदेला प्रारंभ होणार आहे. राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी दाखल व्हायला मंगळवारी सुरुवात झाली.
कोरोनाचे नियम पाळून परिषद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सचे पालन करुन सभागृहात विविध संघटनांच्या प्रतिनिधींसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. परिषदेसाठी येणाऱया प्रतिनिधींना प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर, मास्क दिले जाणार आहेत. प्रवेश करताना त्यांचे थर्मल स्पॅनरद्वारे टेम्परेचर तपासले जाणार आहे. या गोलमेज परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीले आहे. येथून मराठा आंदोलनाची दिशा ठरुन रणशिंग फुंकले जाणार आहे.