प्रतिनिधी / कोल्हापूर
कसबा बावडा येथील 62 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट सोमवारी दुपारी पॉझिटिव्ह आला. शहरांतर्गत कसबा बावडा परिसरातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ही महिला 15 दिवसांपुर्वी साताऱयात जाऊन आली होती. तिला त्रास सुरू झाल्याने शनिवारी सीपीआर कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिच्या स्वॅबचा रिपोर्ट सोमवारी मिरज येथून पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हय़ात यापुर्वी पुणे आणि इस्लामपूर येथून आलेल्या संशयित रूग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये मंगळवार पेठेतील भक्तीपुजानगर येथील 2 आणि पेठवडगाव येथील एक पॉझिटिव्ह रूग्ण मिळून आला आहे. यातील दोघांवर खासगी रूग्णालयात तर एकावर मिरज येथील मेडीकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोना संशयित आतापर्यत पाच जणांचा मृत्यू झाला असला तरी त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांचा मृत्यू अन्य कारणांनी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन काटेकोर राबवल्याने कोरोंटाईन व्यक्तींची संख्या वाढली आहे.
कसबा बावडा मराठा कॉलनी येथील महिला 15 दिवसांपुर्वी सातारा येथे नातेवाईकांकडे गेली होती. तेथून ती परत आली. शनिवारी तिला त्रास सुरू झाला. सीपीआरमध्ये तपासणीत तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे तिचा स्वॅब घेऊन मिरज येथे तपासणीसाठी पाठवला होता. तिला सीपीआर कोरोना हॉस्पिटलमधील आयसोलेटेड वॉर्डमध्ये दाखल केले होते. सोमवारी दुपारी मिरजहून तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दुपारी 4 वाजता रूग्णांकडून ट्रव्हल हिस्ट्रीची माहिती घेतली. तिने 15 दिवसांपुर्वी साताऱयात जाऊन आल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, कसबा बावडय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने महापालिका यंत्रणा कसबा बावडय़ात पोहोचली आहे.
चार पॉझिटिव्ह तर 251 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
सीपीआरमध्ये 12 फेब्रुवारीपासून आजपर्यत 461 परदेशी प्रवास केलेल्या आणि 4 हजार 62 देशांतर्गत प्रवास केलेल्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये संशयित 300 जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कसबा बावडा येथील रूग्ण हा जिल्हय़ातील चौथा तर शहरातील तिसरा आहे. पुणे, मिरज येथील प्रयोगशाळेतून 251 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. निष्कर्ष नसलेले 8 रिपोर्ट असून अप्रमाणित असलेले 39 रिपोर्ट असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली.