प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरासह करवीर तालुका व इचलकरंजी येथील हॉटस्पॉटमधील नागरिकांच्या सेरॉलॉजीकल सर्व्हेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. शनिवारी गणेश आगमनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात बीडशेड व गणेशवाडी येथील सात जणांची रक्त चाचणी घेण्यात आली. क्रोम क्लिनिकल रेसर्च अँड मेडिकल टुरिझम संस्थेतर्फे हा सर्व्हे केला जात आहे.
राज्यातील हॉटस्पॉटमध्ये कोल्हापूरची भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई व महापालिका आयुक्त डॉ. मल्लिकार्जुन कलशेट्टी यांनी नागरिकांच्या रक्तातील कोरोना विषाणूविरुद्ध प्रतिपिंडांच्या (सेरॉलॉजीकल सर्व्हे) चाचणी सर्वेक्षणाची संकल्पना मांडली. त्यानुसार डॉ. धनंजय लाड यांनी क्रोम क्लिनिकल रेसर्च अँड मेडिकल टुरिझम संस्थेतर्फे या सर्व्हेची तयारी केली आहे.
या सर्व्हेसाठी 2 ते 16 ऑगस्ट या काळात झालेल्या हॉटस्पॉटची निवड करण्यात आली आहे. सुरवात उद्या(सोमवार)पासून केली जाणार आहे. 108 रुग्णवाहिकेतून ’क्रोम क्लिनिकल’ चे पथक नागरिकांची रक्त चाचणी घेणार आहे. शनिवारी गणेश आगमनाच्या मुहूर्तावर प्रातिनिधिक स्वरूपात करवीर तालुक्यातील बीडशेड व गणेशवाडी येथील सात जणांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.
हॉटस्पॉटमधील एक हजारजणांची होणार रक्तचाचणी
या सर्व्हेत हॉटस्पॉट असलेल्या कोल्हापूर शहरातील 500, करवीर तालुक्यातील 250, इचलकरंजीतील 250 जणांची रक्तचाचणी केली जाणार आहे. 14 दिवसात एक हजारजणांची चाचणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे