शहरातील दूध वितरकांचा इशाराः दंडात्मक कारवाई केल्याने संताप , घरपोच दूध विक्री अशक्य, जागेवरुन विक्रीस परवानगी देण्याची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरात दूकानच्या दारात दूध विक्री केल्याने तसेच रस्त्यावर दूधाचे क्रेट उतरल्याने काही दूध वितरकांवर महापालिका, पोलीसांनी दंडात्मक कारवाई केली. पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत दंड वसुल केल्याने `आमदनी आठ्ठणी खर्चा रुपया’ अशी अवस्था वितरकांची झाली आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करणार असला तर संपूर्ण शहरातील दूध विक्री रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा इशारा वितरकांनी दिला आहे. घरपोच दूध विक्री शक्य नसल्याने प्रशासनाने जागेवरुन दूध विक्रीस परवानगी द्यावी अशी मागणी वितरकांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शनिवारी रात्री बारा वाजल्यापासून जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामध्ये भाजीपाला व दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र जागेवरुन विक्री न करता घरपोच विक्री करण्याची अट प्रशासनाने घातली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी शहरात जागेवरुन दूध विक्री करणारे वितरक, दूकानदार यांच्यावर महापालिका व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तसेच पुन्हा जागेवरुन विक्री केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. प्रशासनाच्या या भुमिकेमुळे मानसिक त्रासासह उत्पन्नपेक्षा दंडच अधिक झाल्याने वितरकांमधून संताप व्यक्त होत आहे.
वितरक-दूकानदार-ग्राहक अशी साखळी
शहरात गोकुळ दूधाला सर्वाधिक मागणी आहे. सुमारे 650 ते 700 गोकुळचे दूध वितरक आहेत. गोकुळ दूध संघाकडून वितरकांना घरापोच दूध दिले जाते. वितरक दूकानदारांना दूध पोहच करतात. तर दूकानदार दूधाची विक्री ग्राहकांना करतात. अशी दूध विक्रीची साखळी आहे. रविवारी सकाळी दूकानाबाहेर विक्री करत असताना, जागेवरुन विक्री करण्यास परवानगी नसल्याचे सांगत महापालिका, पोलीस प्रशासनाने कारवाई केली. पूर्णपणे घरपोच दूध विक्री शक्य नसल्याने दूध विक्रीच बंद ठेवण्याच्या मनस्थितीत शहरातील वितरककांसह दूकानदार आहेत.
दररोज दिड ते दोन लाख लिटर विक्री
शहर उपनगर परिसरात विविध दूध संघांचे मिळून दररोज सुमारे दिड ते दोन लाख लिटर दूध विक्री होते. लॉकडाऊन काळात सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत दूध विक्रीस परवानगी दिली आहे. दोन लाख लिटर दूध वितरण करताना वितरकांना हाच वेळ पुरत नाही. अशामध्ये जर घरपोच विक्री करयाची म्हटले तर ती अशक्य बाब असल्याचे वितरकांमधून सांगण्यात येत आहे. विक्री बंद केल्यास दररोज दिड ते दोन लाख लिटर दूध विक्री ठप्प राहण्याची शक्यता आहे.
जागेवरुन दूध विक्रीस परवानगी द्या
शहरात एक वितरक किमान दोनशे लिटरपासून अडीच हजार लिटरपर्यत दूधाची विक्री करतो. उन्हाळा असल्याने ठराविक वेळेत दूध वितरण पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा दूध खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरपोच विक्री करताना वितरकांसमोर अनेक अडचणी आहेत. प्रशासनाने दूध वितरण व्यवस्थेचा विचार करुन जागेवरून दूध विक्रीस परवानगी द्यावी, दंडात्मक कारवाई थांबवावी अन्यथा उद्यापासून रविवारपर्यंत दूध विक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. – सागर साळोखे, अध्यक्ष दूध केंद्रचालक वितरक असोसिएशन.