-अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांची माहिती, -हाफकीनपेक्षा कमी दराने खरेदी
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱया अॅटीजेन टेस्ट किट व व्हिटीएम किट खरेदीची प्रक्रिया नियमानुसार पार न पडल्यामुळे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी उषादेवी कुंभार यांच्याकडे खुलासा मागितला होता. पण त्यांनी सदरची खरेदी प्रक्रियाच पार पडली नसल्यामुळे नव्याने कोटेशन मागवून पारदर्शक पद्धतीने किटची खरेदी करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी दिली.
माने म्हणाले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी उषादेवी कुंभार यांनी नियमबाह्य पद्धतीने अॅटीजेन किटची खरेदी प्रक्रिया राबविल्याची तक्रार झाली होती. याबाबत कुंभार यांच्याकडून खुलासा मागवला होता. पण वस्तूस्थिती पाहता त्यांनी कोणत्याही स्वरूपाची खरेदी केली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामूळे 10 लाखाच्या मर्यादेपर्यंत अॅटीजेन किटची खरेदी करण्यासाठी नव्याने कोटेशनची मागणी करण्यात आली. यामध्ये हाफकीनपेक्षाही कमी दर असलेल्या कोटेशनधारकाकडून किटची खरेदी करण्यात आली. हाफकीनच्या दरपत्रकानुसार एक अॅटीजेन किटचा दर 89 रूपये आहे. पण 47 रूपये दराने किट पुरवण्याबाबत कोटेशन भरलेल्या ठेकेदाराकडून किटची खरेदी करण्यात आली. माझ्यासह प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी उषादेवी कुंभार व वित्तच्या अधिकाऱयांच्या उपस्थितीत खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. मागणीनुसार 21 हजार किटची खरेदी करून त्याचे वितरण देखील सुरु केले असल्याची माहिती माने यांनी दिली. त्यामुळे किट खरेदी प्रकरणातील अनियमिततेच्या विषयावर अखेर पडदा पडला आहे.