सुपर संडेला सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी प्रचाराची सांगता होत आहे. सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. मंगळवार 12 एप्रिलला प्रत्यक्ष मतदान असल्याने आजचा रविवार हा उमेदवार, त्यांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी सुपर संडे ठरणार आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या मतदारापर्यंत पोहचण्यासाठी आपली ताकद पणाला लावणार असून त्यासाठी रॅली, महारॅली, पदयात्रा, गाठीभेटींचे आयोजन केले आहे. त्यामुळे आजच्या दिवशी शहरातील वातावरण ढवळून निघणार आहे.
कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर गेल्या पंधरा वीस दिवस शहरात सर्व पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केला. पण प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव आणि भाजपचे सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यात लढणार होणार हे स्पष्ट असल्याने दोन्ही उमेदवारांच्या पक्षांनी ताकद लावली आहे. महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार युवराज मालोजीराजे यांनी प्रचारात जोर लावला आहे. तर भाजपच्या प्रचाराची धुरा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, राहुल चिकोडे सांभाळत आहेत. दोन्ही पक्षांच्या राज्यस्तरावरील नेते, मंत्र्यांनी प्रचारातील रंगत वाढविली. आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही प्रमुख पक्षांकडून शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.
महाविकास आघाडीकडून आज रविवारी सकाळी गांधी मैदानातून महारॅली काढण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणाऱया या महारॅली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर भाजपकडूनही पदयात्रा, रॅलीचे आयोजन केले आहे.
फडणवीस, चंद्रकांतदादा
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस शनिवारी जाहीर सभा आटोपल्यानंतर कोल्हापूरमध्ये मुक्कामास आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटीलही तळ ठोकून आहेत. आज रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या दोघा नेत्यांकडून जोडण्या लावण्यासंदर्भात पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले जाणार आहे.