संग्राम काटकर / कोल्हापूर
पंधरा वर्षापूर्वी 21 फुटी गणेशमूर्तीचे विसर्जन जेसीबीद्वारे व्हायचे. मात्र ही बाबच न पटल्याने शाहूनगरातील शाहू तरुण मंडळाने फायबरमधील फोल्डींगची गणेशमूर्ती बनवून घेऊन प्रत्येक गणेशोत्सवात तिची प्रतिष्ठापना करण्याचा पर्यावरणपूरक पायंडा पाडला. याचवेळी पाणी प्रदुषणाच्या मुद्यावरुन गणेशमूर्ती प्लास्टरची की शाडूची हाही प्रश्न गंभीर झाला होता. पण मंडळांनी या प्रश्नावर उत्तर शोधले नाही. मात्र 2014 सालच्या गणेशोत्सवात जवाहरनगरातील सद्भावना सांस्कृतिक, क्रीडा व व्यायाम मंडळाने तर 2016 च्या गणेशोत्सवात शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळाने फायबरच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन पर्यावरण संवर्धनाची हाक दिली. आता या हाकेच आपले सूर मिसळत यंदाच्या गणेशोत्सवापासून गजानन महाराज तरुण मंडळ व शाहूपुरी युवक मंडळाने फायबरच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन पर्यावरण संवर्धनाची चळवळीला बळकटी आणली आहे.
सद्भावना सांस्कृतिक, क्रीडा व व्यायाम मंडळ

जवाहरनगरातील हे मंडळ प्लॉस्टरच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत होते. 2014 सालच्या गणेशोत्सवावेळी मात्र पर्यावरणाला महत्व देत कायमस्वरुपी फायबरची गणेशमूर्ती बनवून घेऊन तिची प्रतिष्ठापना केली. गणेशमूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते राहूल कोकणे यांनी आपली जागा मंडळाला दिली. या जागेत बनवलेल्या काचपेटीत गणेशमूर्ती ठेवली जाते. एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक गणेशजयंतीदिनी नागरिकांकडून अवयवदानाचे फॉर्म भरुन घेऊन ते आरोग्य यंत्रणेकडे देतो, असे मंडळाचे अध्यक्ष सुशील कदम यांनी सांगितले.

विद्यार्थी कामगार मंडळ
शिवाजी पेठेतील विद्यार्थी कामगार मंडळाने पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत उडी घेऊन 2016 सालच्या गणेशोत्सवात फायबरच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची नवी परंपरा सुरु केली. गणेशोत्सवात पूजाअर्च्चेसाठी चेतना विकास मंदिरातील विशेष मुलांनी शाडूपासून बनवलेल्या छोट्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मंडळाने पर्यावरण संवर्धनाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. तसेच मंडळाच्या इमारतीमध्ये अभ्यासिका, अंगणवाडी, वाचनालय अन् व्यायामशाळेची स्थापना करुन शिक्षणाबरोबरच सुदृढ आरोग्याचा मंत्र समाजाला दिला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सचिन वणीरे यांनी सांगितले.
शाहूपुरी युवक मंडळ, शाहूपुरी

2016 साली या मंडळाने बनवलेल्या प्लास्टरच्या गणेशमूर्तीचे पाणी प्रदुषणाच्या मुद्यावरुन चार वर्षे विसर्जन केले नाही. गणेशोत्सवानंतर मूर्ती थेट सांगवडेतील मूर्तीकारांकडे दिली जात होती. यंदाच्या गणेशोत्सवापासून मात्र मंडळाने प्लास्टरऐवजी फायबरच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करुन पाणी प्रदुषणविरोधी नारा दिला आहे. मंडळाच्या सामाजिक कार्याबद्दल सांगताना अध्यक्ष रमेश पोवार म्हणाले, 30 वर्षापूर्वी शाहूपुरी व्यापारी पेठेतील तात्यासाहेब मोहिते विद्यामंदिरात सुरु केलेली बालवाडी आजतागायत सुरु आहे. समाजातील गरजवंनात आर्थिक मदत देऊन त्यांचे पाठीराखे बनणे हे मंडळाचे प्रमुख ध्येय आहे.

गजानन महाराजनगर तरुण मंडळ
गजानन महाराजनगरातील हे मंडळ सर्वांना एकत्र आणण्यासाठी गेल्या 21 वर्षांपासून गणेशोत्सवाच्या आधी दोन दिवस महाप्रसाद आयोजित केला जात आहे. यंदाच्या गणेशोत्सवापासून मंडळाने प्लास्टरच्या गणेशेमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत बंद करुन कायमस्वरूपी फायबर गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठानेला सुरुवात केली आहे. उत्सवानंतर महापालिका अथवा दानशूर व्यक्तीकडून जागा घेऊन त्यामध्ये गणेशमूर्ती सुरक्षित ठेवण्याचे मंडळाने ठरवले आहे. मंडळ गेल्या 11 वर्षांपासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर आयोजित करुन आपले रक्त गरजूंनाच मिळेल, यासाठी झटत असते, असे कार्याध्यक्ष नितीन मराठे यांनी सांगितले.