प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवसायाला 2000 कोटी रुपयांहून अधिक फटका बसणार आहे. तसेच वार्षिक नफा 40 ते 43 कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही चिंता व्यक्त केली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण अर्थ कारणांमध्ये केडीसीसी बँकेचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील लोकडाऊन मुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय, साखर उद्योग या क्षेत्रातील उलाढाल ठप्प झाली आहे. परिणामी, जिल्हा बँकेच्या उलाढालीवरही परिणाम झालेला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची शिखर संस्था असल्यामुळे पतसंस्था, नागरी बँका, प्राथमिक विकास सेवा संस्था, दूध संस्था, प्रक्रिया संस्था इत्यादींचे व्यवहार हे या बँकेच्या माध्यमातून होत असतात.
आत्ता भारतीय रिझर्व बँकेने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवसाय ही नियमित चालू राहण्याच्या दृष्टीने कोवीड-19 हे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये सर्व मुदती कर्जांचे, भांडवली कर्जे इत्यादींचे 1 मार्च ते 31 मे 2020 या कालावधीतील नावे पडलेले व्याज व व देय असलेले हप्ते यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. दरम्यान, या काळामध्ये नावे पडलेले व्याज तीन महिन्यानंतर वसूल करून घ्यावे, असा आदेश केलेला आहे. तसेच या काळातील मुदती कर्जाचे हप्ते पुनर्रचना करून द्यावेत, अशी सूचनाही या आदेशात केली आहे. 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या काळातील कर्जांचे, या काळात खरीप पिकासाठी वाटप केलेल्या कर्जाच्या देय असलेल्या रकमेला तीन महिने मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे बँकेला 40 ते 43 कोटी रुपये वार्षिक नफ्याला फटका बसणार आहे.या सगळ्याचा परिणाम बँकेच्या दोन हजाराहून अधिक व्यवसाय उलाढालीवर होणार आहे.
दरम्यान, सर्वसामान्यांची अडचण होऊ नये म्हणून सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत केंद्र कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व म्हणजेच 191 शाखांमधून बँकेचे व्यवहार सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील 27 एटीएम सेंटरमधून आपले व्यवहार सुरू ठेवले आहेत. बँकेचे जास्तीत जास्त व्यवहार एटीएम व ट्रान्सफर करावेत तसेच अत्यावश्यक तेवढेच व्यवहार करावेत, अशी विनंतीही एसएमएस प्रणालीद्वारे ग्राहकांना केलेली आहे.
पूरबाधिताना 100% कर्जपुरवठा करणार
यापूर्वी पूरबाधिताची 71 टक्के रक्कम बँकेकडे आली होती. त्यामुळे पुढील हंगामासाठी पूरबाधितांना 71 टक्के याप्रमाणे कर्ज वाटप करण्याचा निर्णय बँकेने घेतला होता. परंतु, उर्वरित 29 टक्के रक्कमही सहकार विभागाकडे जमा झाली आहे. त्यामुळे पूरबाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये झाला.
Related Posts
Add A Comment