प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्याबाहेरुन कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्यातील एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या सर्व व्यक्तींना कोरोना नसल्याचे ‘आरटीपीसीआर’ किंवा ‘अँटीजेन’ चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी रद्द केले. त्यामुळे कोणत्याही अटीशिवाय परजिल्ह्यातील नागरिकांना कोल्हापूरात प्रवेश करता येईल. परंतु शासनाच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी, तसेच अलगीकरण व विलगीकरणाची कार्यवाही सुरुच राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी (दि.6) जिल्ह्याबाहेरुन कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्यातील एका गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्या सर्व व्यक्तींना कोरोना नसल्याचे `आरटीपीसीआर’ किंवा `अँटीजेन’चाचणीचे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे आदेश काढले होते. परंतु या आदेशामुळे नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने हा आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी बुधवारी मागे घेतला. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना नसल्याच्या प्रमाणपत्राचे बंधन राहणार नाही. तसेच शासनाच्या निर्देशानुसार स्वॅब तपासणी व अलगीकरण, विलगीकरणाची कार्यवाही सुरुच राहील, असे या आदेशात म्हटले आहे.