कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय
आढावा बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
महापौर, आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील कोरोना रूग्णांची संख्या घटली असली तरी धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर आगामी दसरा आणि दिवाळी या दोन महत्वाच्या सणावेळी अंबाबाई मंदिर परिसरासह मुख्य बाजार पेठांमध्ये नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष पथके कार्यान्वीत केली जाणार आहेत. त्याचबरोबर कोविड जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबरोबर पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.
महापालिकेत गुरूवारी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांचा आढावा घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, प्राथमिक शिक्षण सभापती श्रावण फडतारे, प्रभाग समिती सभापती रिना कांबळे, गटनेते शारंगधर देशमुख, राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
कोरोना कमी झाला असला तरी धोका कायम आहे, याबद्दल प्रबोधन करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यक्रम राबवावा, असे महापौर आजरेकर यांनी सांगितले. आयुक्त डॉ. बलकवडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून दसरा, दिवाळी सणांच्या काळात अंबाबाई मंदिर परिसर आणि शहरातील मुख्य बाजार पेठामध्ये गर्दी रोखण्यासाठी विशेष पथके कार्यान्वीत केली जातील, असे स्पष्ट केले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यापुढे पोस्ट कोव्हीडचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घ्यावा, यासाठी शाहू स्मारक भवन येथे पोस्ट कोव्हीड सेंटर लवकरच कार्यान्वित करण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. बलकवडे यांनी स्पष्ट केले.
शहरात कोरोना, डेंग्यू , चिकन गुनिया अशा संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी औषध फवारणी, फॉगिंग, हॅन्ड पंपाद्वारे फवारणी तसेच अन्य कार्यक्रम आरोग्य विभागाने राबवावेत, अशी सुचना महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, गटनेते शारंगधर देशमुख यांनी केली.
बैठकीला नगरसेवक अर्जुन माने, नगरसेविका माधूरी लाड, उपआयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, संदिप घारगे, चेतन कोंडे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, आारोग्यधिकारी डॉ. अशोक पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगररचना सहा.संचालक रामचंद्र महाजन, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, रावसाहेब चव्हाण, बाबुराव दबडे, हर्षदिप घाडगे, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.
कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत
महापालिकेच्या सेवेत असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे देय असणाऱ्याया मदतीचे प्रस्ताव तात्काळ पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. एचआरटीसी रुग्णांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या वारसांना मदत देण्याच्या सूचना महापौर आजरेकर यांनी केल्या. कोरोनामुळे नऊ कर्मचारी यांचे मृत्यू झाले असून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सहा जणांचे प्रस्ताव शासनामार्फत विमा कंपनीला पाठविण्यात आलेले आहेत. उर्वरीत तीन कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात येतील. कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय बिल रियंबर्समेंटद्वारे महापालिका देईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
ब्लड कंपौनंट बँक प्राधान्याने उभारा – स्थायी सभापती सचिन पाटील
शहरात ब्लड कंपौनंट बँकेची उभारणी प्राधान्याने करण्याची सूचना स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी केली. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी सर्व पदाधिकारी तसेच नगरसेवकांनी केली. याबाबत आवश्यक ती पूर्तता पूर्ण करुन हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या सुचना आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी यावेळी केली.
महापालिकेच्या गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार भाडे आकरण्याबाबत शासन निर्देश आहेत. 2015 पासून गाळेधारकाकडून भाडे वसूली झालेली नाही. त्याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. याबाबत इस्टेट विभागाने शासन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करुन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी सुचना गटनेते शारगंधर देशमुख यांनी केली.
बैठकीत करण्यात आलेल्या इतर सूचना
-गाडी अड्डा पार्किंगमध्ये असणारी अतिक्रमणे काढण्यात यावीत.
-सरस्वती टॉकीज येथील मल्टीलेवल कार पार्किंग उभारणी सुरू करा.
-शहराच्या तिसऱ्या सुधारीत आराखडा करण्याची कार्यवाही सुरू करा.
-शहरात एलईडी बसविण्याचे काम गतिमान करावे.
-पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी पूर्ण क्षमतेने सुरु ठेवा
-बापट कॅम्प, कदमवाडी, कसबा बावडा स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसविण्याबाबत
नियोजन करा
– स्मशानभूमींचे सुशोभिकरण करण्याबरोबरच कंपौड वॉल आणि परिसरात झाडे लावा.- सार्वजनिक शौचालये तसेच मुताऱयांची वेळोवेळी स्वच्छता करावी
-बीओटीतील 11 सार्वजनिक शौचालयाच्या देखभालीची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करा.
-वर्कशॉपसह अन्य विभागाकडील स्क्रॅप व रददी विकण्याबाबत लिलाव प्रक्रिया राबवावी.
-कर्मचाऱ्यांची भरती व पदोन्नती तसेच ठोकमानधावरील अधिकारी कर्मचाऱ्यांची मानधनवाढ याबाबतही आवश्यक कार्यवाही करा.
-आयटीपार्क उभारणीतील अडचणी दूर करुन आवश्यक कार्यवाही करा.
– झूम प्रकल्पाजवळील डांबर प्लॅन्ट इतरत्र स्थलांतरीत करून सुरु करावा.
– लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार पुर्ण क्षमतेने स्थलांतरीत करावा.
-थेट पाईप लाईन योजनेची कामे मार्गी लागण्यासाठी सुकाणू समितीची बैठक घ्यावी.
-महापालिकेचे विविध देयके व कर भरण्यासाठी ऍप तयार करा.
महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी वसुलीबरोबरच अन्य उत्पन्नवाढीचे पर्याय शोधले जातील. केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतही आवश्यक कार्यवाही केली जाईल. महापालिकेत ईऑफिस प्रणालीव्दारे कामकाज करण्याचा मानस आहे. मात्र हे काम होईपर्यंत सर्व प्रशासकीय कामकाज पुर्वीच्याच पध्दतीने मॅन्युअली केले जाईल.
-डॉ. कादंबरी बलकवडे, आयुक्त कोल्हापूर महापालिका