पेठ वडगाव / प्रतिनिधी:
नवीन शैक्षणिक धोरण हे बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणारे व अदानी-अंबानी यासारख्या भांडवलदारांचे खिसे भरणारे आहे. या शैक्षणिक धोरणातून भारतीय संविधानाच्या मूल्यांना बगल दिली आहे. राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरातून या धोरणाला विरोध सुरू होऊन तो पूर्ण देशभर पोहोचेल असा विश्वास आमदार राजू बाबा आवळे यांनी व्यक्त केला. ते शिक्षण वाजवा नागरी कृती समितीच्या हातकणंगले तालुक्यातील सर्वपक्षीय बैठकीत ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
या बैठकीत बोलताना, गिरीश फोंडे म्हणाले, या शैक्षणिक धोरणाद्वारे ३० पटा खालच्या २८टक्के शाळा बंद होतील व ३ हजार विद्यार्थी संख्या खालील महाविद्यालय बंद होऊन केवळ ४ टक्केच महाविद्यालय सुरू राहतील. तसेच परदेशी विद्यापीठांना देशात मोदी सरकार आणून लाखो रुपयांची फी विद्यार्थ्यांच्याकडून उकळेल. ऑनलाइन शिक्षणातून गरिबांचे शिक्षण हिरावले जाईल.
बबनराव पाटील म्हणाले ,केंद्र सरकारचा कारभार हा लोकशाहीला धरून नाही. संसदेमध्ये किंवा मंत्रिमंडळ देखील चर्चा न करता हुकूमशाही पद्धतीने निर्णय जनतेवर लादले जातात.
सुभाष जाधव म्हणाले, मोदी सरकारचा शैक्षणिक धोरण लादण्याचा निर्णय म्हणजे संघराज्य पद्धतीवर हल्ला आहे. याविरोधात जन आंदोलन उभारावे. राम करे म्हणाले, मोदी सरकारने कोट्यवधी तरुणांना बेरोजगार करत रस्त्यावर सोडले. शिक्षकांची भरती कित्येक दिवस झाली नाही. डीएड बीएड सेट-नेट धारक तुटपुंज्या पगारावर वेठबिगारी करतात.
यावेळी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनादिवशी शक्य तितक्या गावांमध्ये शैक्षणिक धोरणाची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल व हातकणंगले तालुका कचेरीसमोर होळी करून निवेदन देण्यात येईल असे निर्णय घेण्यात आले.
अभिजीत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.अन्सार देसाई यांनी आभार मानले. यावेळी डॉ. विजय गोरड, भगवानराव जाधव, स्वाती क्षिरसागर, एस एम पाटील, महेश जगताप, अभिजीत दबडे, रवींद्र जाधव, मोहसीन पोवाळे, पांडुरंग लोकरे, रामकृष्ण लोकरे, महिपती दबडे,निलेश गरड यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.