प्रतिनिधी / पन्हाळा
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत आहे. कोरोनाची साखळी कमी होण्याऐवजी त्यात वाढ होत असल्याचे चित्र पन्हाळा तालुक्यात दिसून येत आहे. सुरुवातीला पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असलेल्या पन्हाळा तालुक्यात आता कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार गेला आहे. आज तालुक्यात चौदा रुग्णांची भर पडली. यामध्ये पोर्ले गावातील तब्बल दहा जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने समूह संसर्गाची भिती निर्माण झाली आहे.तर कोतोली येथे 1, दरेवाडी 2 व पडळ 1 अशी एकूण 14 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या 110 वर पोहचली आहे.
पन्हाळा तालुक्यात पोर्ले,करंजफेण, कोतोली, सातवे कोडोली, कळे आदी मोठ्या गावात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यात विशेषता तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजफेण, कोतोली, पोर्ले या गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाची संख्या वाढली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात सुरुवातीला काही गावात एक अथवा दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळत होते. मात्र, कोतोली करंजफेण,पोर्ले या गावात आता एकाचेळी तब्बल 10-12 रुग्ण आढळून येत असल्याने समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
आज पोर्ले गावात तब्बल दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठ पैकी एक असलेल्या कोतोली गावात कोरोना ने जोरात मुसंडी मारल्याचे चित्र दिसत असून गावात एकुण 24जणांना कोरोनाची बाधा झाली असुन आज देखील येथे 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. तसेच दरेवाडी येथे 2व पडळ येथे 1रुग्ण आढळला असून तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी दमछाक होत असून या कोरोनावर मात कशी करायची हे सर्वांच्या समोरच एक मोठे आवाहन उभे राहिले आहे तर वाढत्या रुग्ण संख्येमुळे तालुक्यातील नागरिकांच्या भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, आज आखेर पन्हाळा तालुक्यात एकूण 110 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 35 रूग्ण हे पूर्णपणे बरे होवुन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.तर कोरोना ने तालुक्यात एकाचा बळी घेतला आहे. सध्या तालुक्यात 74 जण उपचारात आहेत. या रुग्णांवर पन्हाळा कोविड सेंटर व सीपीआर कोल्हापूर येथे, काहीवर कोल्हापूर येथील सुर्या व डीवायपाटील या खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कातील सर्वांना अलगीकरण करुन कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचे स्वॅब तपासणीचे काम दिले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.